सदा सरवणकरांना क्लीनचिट, भास्कर जाधवांचा भाजपावर हल्लाबोल

दादर गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली. . यावर आता भास्कर जाधव यांनी भाजपावर हल्लाबोल चढवलाय.

MLA Sada Saravankar Clean Chit

दादर गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चिट देण्यात आली. दादरमधील ज्या ठिकाणी गोळीबार झाला पण तो सदा सरवणकर यांनी केला नसल्याचा निष्कर्ष पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. बॅलेस्टिक अहवालात बंदुकीतून गोळीबार झाला असल्याचा रिपोर्ट होता. मात्र पोलिसांनी आता आमदार सदा सरवणकर यांना क्लीन चीट दिली. यावर आता भास्कर जाधव यांनी भाजपावर हल्लाबोल चढवलाय. “त्यांना क्लीनचिट मिळायलाच पाहिजे होती. हे सर्व भाजपाच्या धोरणांनुसारच घडलं आहे”, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना-भाजपा सरकारवर ताशेरे ओढलेत. यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “सदा सरवणकर यांनी तीन महिन्यांपूर्वी स्वत: रिवॉल्वरमधून गोळी झाडली होती, असा अहवाल आला होता. आता तीन महिन्यांनंतर त्यांना याप्रकरणी क्लीनचीट दिली आहे. यात विशेष असं काहीही नाही. यापूर्वी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्यांची ईडीने आणि सीबीआयने चौकशी केली, ते लोक भाजपात गेल्यानंतर त्यांना क्लीनचीट मिळत गेली. त्यामुळे सदा सरवणकर हे भाजपाच्या सरकारमधले एक घटक पक्ष आहे. त्यामुळे त्यांना क्लीनचिट मिळायलाच पाहिजे होती. हे सर्व भाजपाच्या धोरणांनुसारच घडलं आहे”

यापुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, “फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट मिळाली. तसेच १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केल्यानंतर परमवीर सिंग यांच्यावर कोणताही कारवाई झाली नाही. खरं तर कोणालाही आपल्यावरील आरोपांमधून सुटका करून घ्यायची असेल त्यांनी भाजपामध्ये जावं किंवा भाजपाला समर्थन तरी द्यावं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळाली, यात आश्चर्यकारक काहीही नाही”, असेही ते म्हणाले.

नवाब मलिक यांच्यावरील कारवाईवरूनही त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. “नवाब मलिक यांना भाजपा संशयाच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांना देशद्रोही ठरवते आणि आता शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे यांनी एक तासाच्या मुलाखतीत स्वत: दाऊद इब्राहीमशी संबंधित महिलेला आर्थिक मदत दिल्याची कबुली दिली आहे. मग तेव्हा भाजपाचा राष्ट्रभक्ती कुठं जाते?” असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधलाय. “आता उर्फी जावेदच्या कपड्यावर बोललं जात नाही, ती भाजपात गेली की काय? असं बोलून त्यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावलाय.