मुंबईला तुंबवून दाखवलं…, अतुल भातखळकरांची शिवसेनेवर टीका

मुंबई : मुंबई आणि परिसरात कालपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईतील अनेक भाग जलमय झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होत असते, यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

सायन, बोरिवली, कांदिवली, अंधेरी सब-वे तसेच दक्षिण मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले असून त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शिवाय, साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांबरोबरच नागरिकांची तारांबळ उडत आहे. आता हवामान खात्यान मुंबईसह उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असल्याने शहरात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर, मुंबईकराचे आणखी हाल होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पावसाळ्याआधी नालेसफाईची कामे पालिकेकडून हाती घेण्यात येतात आणि पहिल्या पावसातच यातील फोलपणा उघड होतो. त्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर शिवसेना कायम असते. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली आहे. नाल्यातले पैसे खाल्ले, कचऱ्यातले खाल्ले, मुंबईला तुंबवून दाखवलं… आता शिवसेनेने मुंबई महापालिकेतून देखील तोंड काळे करण्याची तयारी ठेवावी…, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – कोकणात ऑरेंज अलर्ट; रेल्वे रुळांवर पाणी, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या