घरमुंबईभीम आर्मीची मुंबईतली सभा रद्द, चंद्रशेखर आझाद मनालीतच?

भीम आर्मीची मुंबईतली सभा रद्द, चंद्रशेखर आझाद मनालीतच?

Subscribe

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्या वरळीतल्या जांभोरी मैदानातल्या सभेला प्रशासनाने केलेल्या तीव्र आक्षेपामुळे ही सभा अखेर रद्द झाली आहे. आता आझाद यांच्या पुढच्या दौऱ्याचं काय होणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असलेली मुंबईतली भीम आर्मीची सभा अखेर रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी मालाडमधल्या हॉटेल मनालीमध्ये नजरकैदेत ठेवल्याचे दावे भीम आर्मीकडून आणि स्वत: चंद्रशेखर आझाद यांच्याकडून करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता त्यांना पुण्यातल्या ३० तारखेच्या प्रस्तावित सभेलाही जाऊ दिलं जाणार नसल्याचं वृत्त खात्रीलायक सूत्रांनी दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक वातावरण या मुद्द्यामुळे चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

सभेला विरोध का?

१ जानेवारी रोजी विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी कोरेगाव-भिमामधील विजयस्तंभाजवळ कार्यक्रम होतात. या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने दलित बांधव जमा होतात. मात्र, १ जानेवारी २०१८ रोजी याच सुमारास कोरेगाव-भिमामध्ये उसळलेली दंगल आणि त्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. त्यानुसारच मुंबईत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना सभा घेण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्याच्या शनिवार वाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेतल्या नेत्यांच्या प्रक्षोभक वातावरणामुळे कोरेगाव-भिमामधील परिस्थिती चिघळल्याचं सांगितलं गेलं. त्याच पार्श्वभूमीवर यंदा पोलिस प्रशासन कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही.

- Advertisement -

आझाद यांच्या पुढच्या दौऱ्याचं काय होणार?

२९ डिसेंबर अर्थात शनिवारी चंद्रशेखर आझाद यांची मुंबईच्या वरळी भागातल्या जांभोरी मैदानावर संध्याकाळी ४ वाजता सभा होणार होती. त्यानंतर ३० तारखेला पुण्यात सभा आणि ३१ तारखेला सावित्रीबाई फुले विद्यापीठात व्याखान असा २ दिवसांचा पुणे दौरा आहे. त्यानंतर १ जानेवारीला कोरेगाव-भिमामधल्या विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचं नियोजन आहे. त्यानंतर २ जानेवारीला लातूर आणि ४ जानेवारीला अमरावतीमधल्या त्यांच्या सभा नियोजित आहेत. मात्र, जांभोरी मैदानावरच्या सभेच्या रुपाने त्यांच्या या एकूणच दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -