घरमुंबईभिवंडी महापालिका महापौरपदाची निवडणूक ५ डिसेंबरला

भिवंडी महापालिका महापौरपदाची निवडणूक ५ डिसेंबरला

Subscribe

घोडेबाजाराच्या शक्यतेने हॉटेल्समध्ये गोपनीय बैठका सुरू

भिवंडी शहर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी येत्या 5 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्यामुळे काँग्रेस, शिवसेना व भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी बैठका घेऊन जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीत महापौर व उपमहापौर पदासाठी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये फूट पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रात्रीच्या वेळी येथील हॉटेल आणि धाब्यांवर अनेक गोपनीय बैठका होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही नगरसेवकांमध्ये तंटे निर्माण झाले आहेत. अर्थ कारणातून विवाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचे विशेष पथक सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

भिवंडी महापालिकेचे महापौर पद हे महिला आरक्षण सर्वसाधारण गटासाठी राखीव असल्याने महापौरपदासाठी काँग्रेससह सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेस व शिवसेना पक्षातर्फे सत्तास्थापनेचा दावा केला जात असल्याने महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे.

- Advertisement -

असे आहे बलाबल
भिवंडी महानगरपालिकेत शिवसेना-काँग्रेस युतीची सत्ता आहे. पालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये काँग्रेस 47 , शिवसेना 13, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 9, समाजवादी पक्ष 2 असे पक्षीय बलाबल आहे. महापौर जावेद दळवी यांच्या पदाची मुदत 9 डिसेंबर रोजी संपत असल्याने महापालिका प्रशासनाने महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी कागदोपत्री पत्रव्यवहार कोकण भवन येथे करण्यात आल्यामुळे त्यांनी दिलेल्या आदेशावरून महापौर पदासाठी येत्या 5 डिसेंबर 19 रोजी महापालिका मुख्य सभागृहात निवडणूक होणार आहे. मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी डी.जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे. त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वरिष्ठांच्या आदेशनुसार सुरू केली जाईल. अशी माहिती नगरसचिव अनिल प्रधान यांनी दिली. तसेच वरिष्ठांच्या सुचनेनुसार कार्यक्रमात बदलही होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

महापालिकेत शिवसेना -काँग्रेस युतीची गेली अडीच वर्ष सत्ता असून महापौरपद काँग्रेसकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे आहे. युतीची बोलणी केल्या प्रमाणे आत्ता महापौर पद शिवसेनेला मिळावे यासाठी सेनेच्या नगरसेवकांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांमध्ये तंटा निर्माण झाला असून भिवंडी पालिकेत शिवसेनेचा महापौर असावा यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहेत.

- Advertisement -

त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडी पक्षाचे नगरसेवक सतर्क झाले आहेत. पालिकेत भाजप पक्षाचा महापौर बसविण्यासाठी खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौघुले यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, भाजप पक्षातील नगरसेवकांमध्ये तंटा निर्माण झाल्यामुळे सध्या भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत, तर काँग्रेसमध्ये माजी आमदार रशिद ताहीर मोमीन , महापौर जावेद दळवी व ज्येष्ठ नगरसेवक इमरान खान असे तीन गट निर्माण झाले असून महापौर दळवी यांची भाजपचे खासदार कपिल पाटील व कोणार्क विकास आघाडीचे प्रमुख माजी महापौर विलास पाटील यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे सर्वांचे लक्ष महापौरांच्या भूमिकेकडे लागले आहे.

भिवंडी पालिकेचे महापौर पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसतर्फे रिषिका प्रदीप राका, वैशाली मनोज म्हात्रे शिवसेनेच्यावतीने गुलाबताई नाईक, वंदना काटेकर, अलका चौधरी, कोणार्क विकास आघाडी तर्फे माजी महापौर नगरसेविका प्रतीभा पाटील, भाजप तर्फे अस्मिता चौधरी यांचे नावाची चर्चा आहे. प्रत्यक्षात महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -