दोन आदित्य एकत्र, मनसेसह ‘कृष्णकुंज’ लाही तडा

मनसेचे युवा नेते आदित्य राजन शिरोडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेना, मनसेसह भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्यावर सख्ख्या भावासारखे प्रेम करणार्‍या राजन शिरोडकर यांचा आदित्य हा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे आदित्य शिरोडकर यांच्या प्रवेशामुळे मनसेसह ‘कृष्णकुंज’लाही तडा गेला आहे. लवकरच आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या साथीला आदित्य शिरोडकर आल्याने दोन आदित्य एकत्र येऊन शिवसेनेची ताकद आता दुप्पट झाली आहे.

आदित्य राजन शिरोडकर यांचं ‘पोलिटिकल ऑपरेशन’ शिवसेना आणि युवा सेना यांच्याकडून खूपच गोपनीय ठेवण्यात आले होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव वरुण सरदेसाई यांनी आदित्य शिरोडकर यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. या भेटीत आदित्य शिरोडकर यांनी सेनेत प्रवेश करण्याबाबत व्यूहरचना करण्यात आली. राज ठाकरे यांचे जे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत त्यापैकी राजन शिरोडकर हे आहेत. राज ठाकरे यांचे उजवे हात म्हणून राजन शिरोडकर ओळखले जात. शिवसेना पक्ष सोडून राज ठाकरे यांनी बाहेर पडू नये हे शेवटपर्यंत कानीकपाळी ओरडून सांगण्याचा प्रयत्न राजन यांनी केला. मात्र, उद्धव यांच्याकडून विलक्षण राजकीय कोंडी झाल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ मधून निघाल्यावर राज ठाकरे यांची सर्वार्थाने राजन शिरोडकर यांनी सोबत केली.

पडद्यामागे राहत आर्थिक पाठबळासह चाणक्य नीतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करण्यात राजन शिरोडकर यांचा सिंहाचा वाटा होता. राज यांना साथ देताना शिरोडकर यांनी ठाकरे यांचा बांधकाम व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला. मात्र, काही वर्षांपूर्वी हे दोन्ही मित्र स्वतंत्र झाले. त्याआधीच राज आणि राजन यांचे तिसरे मित्र आशुतोष राणे यांचे निधन झाले. त्यामुळे शुक्रवारी आदित्य शिरोडकर यांच्या सेना प्रवेशामुळे राज यांच्यापासून राजन शिरोडकर कुटुंबिय दुरावल्याची चर्चा मुंबई, पुण्याच्या वर्तुळात होती. या दुराव्याला मातोश्री कन्स्ट्रक्शन संचालकांच्या ईडी चौकशीपासून ठळकपणे सुरुवात झाली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी आदित्य शिरोडकर यांना गळाला लावणे ही गोष्ट सेनेची ताकद माहीम, दादर, वरळी परिसरात वाढवू शकते. मनसेमध्ये विद्यार्थी चळवळीने आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या आदित्य यांनी २०१४ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना राहुल शेवाळे यांच्या समोर दक्षिण-मध्य मुंबईमधून लढताना तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाल्यावर आदित्य शिरोडकर यांची घुसमट होत होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या क्रीडा आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या आदित्य शिरोडकर यांच्यावर लवकरच शिवसेनेतील महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोडून मनसेला महापालिका निवडणुकीपूर्वी अधिकाधिक भगदाडं पाडण्यासाठी शिवसेना नेत्यांनी कंबर कसली आहे. या फोडाफोडीमध्ये दिलेली आश्वासने सेना कशी आणि किती प्रमाणात पाळते यावर शिरोडकर यांच्याप्रमाणे आणखी कितीजण मातोश्रीवर पोहोचणार आणि त्यांना कसे रोखणार याकरता दोन्ही बाजूचे शिलेदार कामाला लागलेत.