धमकीच्या मॅसेजप्रकरणी एकाला विरारमधून अटक, एटीएसची कारवाई

mumbai-police helpline

मुंबई – २६/११ सारखा हल्ला पुन्हा करण्यात येणार असल्याचा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला सकाळी प्राप्त झाला होता. त्यानुसार मुंबई एटीएसने कारवाई करत विरारमधून एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्या क्रमांकावरून मेसेज आलेला तो क्रमांक भारताबाहेरील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

भारतात नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. असं असतानाच दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन येथे एक अज्ञात बोट सापडली. या बोटीमध्ये एके ४७ आणि काही जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ माजली. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करत या बोटीचा छडा लावला असता ही बोट ऑस्ट्रेलियाची असून चुकून श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, २६/११चा हल्ला करण्याकरता आतंकवादी बोटीतून आले होते. त्यामुळे आज प्राप्त झालेल्या संदेशामुळे पोलिसांसह सर्वच सुरक्षा यंत्रणांची धाकधूक वाढली आहे.

२६/११ चा हल्ला करण्यासाठी दहशतवादी पाकिस्तानातून मुंबईच्या कफ परेड येथील मच्छीमार नगरजवळ उतरले. तेथून ते ताज हॉटेलमध्ये जात बेछूट गोळीबार केला. सलग दोन दिवस या आतंकवाद्यांची दहशत मुंबईवर होती. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह जवळपास १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील हा सर्वांत मोठा हल्ला मानला जातो. या हल्ल्यानंतर मुंबईची सुरक्षा वाढवण्यात आली होती. सागरी सुरक्षाही कडेकोट करण्यात आली. त्यानंतर मधल्या काळात समुद्रात हेरगिरी करणाऱ्या अनेक खलाशांनाही सुरक्षा रक्षकांनी पकडले. दोन दिवसांपूर्वीही श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर अशी बोट आढळून आल्याने खळबळ माजली होती. मात्र, ही बोट चुकून भारतात आल्याचं सिद्ध झाल्यानं भितीचं संकट दूर झालं आहे. मात्र, त्यातच आज धमकीचा फोन आल्याने पुन्हा सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आज पत्रकार परिषद घेत संबंधित घटनेची माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. याबाबत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तापस क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे. आमची माहिती आम्ही एटीएस आणि संबंधी यंत्रणांशी शेअर करत आहोत. या मेसेजचा सर्व अँलने तपास सुरू आहे. मी मुंबईवासीयांना आश्वस्त करतो की मुंबई पोलीस याबाबत कुठलाही कॉल लाईट घेत नाहीत. मुंबईला कोणतीही शती होणार नाही या दृष्टीने आमचे संपूर्ण पोलीस दल कार्यरत आहेत.