Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे मराठी मोक्ष मराठमोळा रॉक बँडचा डंका बिहारमध्ये

मराठी मोक्ष मराठमोळा रॉक बँडचा डंका बिहारमध्ये

‘पांडुरंग...’ या मराठी भजनाला विशेष दाद,सागर जोशी आणि सहकार्‍यांचा अभिनव प्रयॊग

Related Story

- Advertisement -

बिहारी आणि मराठी हा भाषावाद जगजाहीर आहे. त्यातच, महाराष्ट्रातील आणि तेही ठाण्यातील एका जगप्रसिद्ध मराठमोळ्या रॉक बँडला बिहार सरकारने आमंत्रित केले. हिंदी आणि मराठी गाण्यांनी मुख्यमंत्र्यांसह बिहारवासी मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे सहा हजार जणांनी ‘पांडुरंग…पांडुरंग’ याचे नामस्मरण एकाचवेळी एका सुरात केले. तर कार्यक्रमाची सांगता, वंदेमातरमने होताना त्या राज्याचे प्रधान सचिव प्रत्यय अमृत यांचा आवाज बिहारवासी यांच्या कानावर पडला. विशेष म्हणजे हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठे सभागृह असलेल्या गंगेच्या काटावरील बापू सभागारमध्ये रंगला. अशाप्रकारे मराठी बँडला महाराष्ट्रात राज्य सरकारसमोर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा या बँडने व्यक्त केली.

बिहार राज्याच्या महावितरण विभागाचा वार्षिक सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना हा सोहळा विशिष्टरित्या संपन्न व्हावा, असे वाटत होते. त्यानुसारच त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यक्रमाची आखणी सुरू झाली. याचदरम्यान राज्याचे प्रधान सचिव प्रत्यय अमृत यांच्यासमोर जगप्रसिद्ध असलेल्या मराठी रॉक बँडचा २०१४ साली झालेल्या मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या १०० व्या वर्षपूर्ती सोहळ्याची काही क्षणचित्रे सादर करण्यात आली. त्यावेळी, शिवाजी महाराजांवरील पहिलावहिला मराठी रॉक अल्बम सादर झाला होता. तो पाहून प्रभावीत झालेल्या अमृत यांनी मोक्ष बँडला कार्यक्रम करण्यासाठी निमंत्रित केले.

- Advertisement -

त्यावेळी बँडचे संस्थापक सागर जोशी यांनी आमंत्रण स्वीकारले. त्यांनी एवढी मंडळी महाराष्ट्रातून नेण्यापेक्षा ज्या विभागासाठी कार्यक्रम करायचा आहे. त्याच विभागात गाण्याची आवड असलेल्या विविध गटातील अधिकार्‍यांपासून कर्मचार्‍यांना सहभागी करावे, असा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे शिपाईला एका मोठ्या अधिकार्‍याबरोबर गाण्याची संधी मिळावी हा या मागचा उद्देश असल्याचे समजताच अमृत यांनी तात्काळ त्यांच्या प्रस्तावाला होकार दिला. तसेच त्यांनी महावितरणला तातडीने गाणे गाणार्‍यांना ऑनलाइन ऑडिशन देण्यास सांगितले. त्यानुसार ८४ जण पुढे आल्यावर त्यातून ४० जणांना रॉक बँडने निवडले.

बँडच्या सदस्यांनी कार्यक्रमाची तारीख जाहीर झाल्यावर बिहारमध्ये जाऊन त्या निवडलेल्या ४० जणांचा एका छताखाली ११ दिवस सराव घेतला. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आदी ज्या सभागृहात कार्यक्रम होणार होता, तेथे रंगीत तालीम झाली. कार्यक्रमात १६ ते १७ गाणी देशभक्ती, एकात्मता यावर हिंदी आणि मराठी गाणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर सादर केली. विशेष म्हणजे मराठीतील शिवाजी महाराजांवरील रॉक अल्बममधील ‘घे भरारी…’ या गाण्यासह ‘पांडुरंग… पांडुरंग…’ हे भजन सभागृहातील जमलेल्यांनी डोक्यावर घेतले. तसेच ‘पांडुरंग… पांडुरंग…’ याचे नामस्मरण करताना सहा हजार जण दिसून आले. त्यातच अमृत यांनाही गाण्याची आवड असल्याने आणि त्यांचा आवाजही खूपच सुंदर असल्याने त्यांना सहभागी होण्यास सांगितले.

- Advertisement -

पण, शासकीय नियमानुसार त्यांना यामध्ये सहभागी होता आले नाही. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरमने होणार असल्याने त्यावेळी त्यांना स्टेजवर पाचारण केले. त्यांच्या आवाजात वंदेमातरम झाले. त्यामुळे सभागृहातील सहा हजार जणांना त्यांचा आवाज ऐकण्याची संधी लाभली आणि मराठी बँडला बिहारच्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या कार्यक्रमासाठी ठाण्यातून मोक्ष रॉक बँडचे संस्थापक सागर जोशी, भूषण देसाई, जिमी अलेक्सण्डेर, जोशू जगली, निषाद मोहिते आणि मोहन अगवणे ही मंडळी बिहारमध्ये गेली होती.

बिहार सरकारमार्फत मराठी बँडला एका विशिष्ट कार्यक्रमाला बोलवणे ही मोठी गोष्ट आहे. या कार्यक्रमात बिहार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एकाला घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचीही चांगली साथ लाभली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात हिंदीबरोबर दोन मराठी गाणी झाली. एक शिवाजी महाराजांवरील अल्बममधील ‘घे भरारी’ तर ‘पांडुरंगा’चे भजन. याच दरम्यान सहा हजार जणांनी पांडुरंगाचे नामस्मरण केल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने बोलावले तर ती नक्कीच अभिमानाची गोष्ट राहील.
– सागर जोशी, संस्थापक, मराठी मोक्ष रॉक बँड

मोक्ष रॉक बँड
मराठी मोक्ष रॉक बँडची स्थापना १ मे २००९ मध्ये झाली. हा जगातील पहिला रॉक बँड असून तशी त्याची नोंदही झालेली आहे. तर या बँडने २०१४ साली शिवाजी महाराजांवरील पहिला मराठी अल्बम तयार करून त्याचे सादरीकरण गेट वे ऑफ इंडियाच्या १०० व्या वर्षपूर्ती सोहळ्यात केले. त्यानंतर, लंडनमध्ये झालेल्या महाराष्ट्र लंडन संमेलनाला बोलावले होते. क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या शेवटच्या सामन्यादरम्यान एक लाईव्ह शोदेखील या बँडने केला होता. तसेच सातारा गौरव सोहळा येथे आपली छाप पाडल्यावर नुकतेच त्यांनी एका मराठी चित्रपटासाठी काम केले आहे. विशेष म्हणजे मोक्ष हा रॉक बँड ठाण्यातील तरुणांचा आहे.

- Advertisement -