फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक : बिहार पॅटर्न महाराष्ट्रात!

मुंबई : भाजपाचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पण आताचा हा निर्णय म्हणजे बिहार पॅटर्नच म्हणावा लागेल. 2020मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे निवडणूक प्रभारी होते.
राज्यामध्ये गेल्या अडीच वर्षांत जेवढी राजकीय उलथापालथ झाली तेवढी आतापर्यंत कधी झाली नव्हती. 2019मध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने ताठर भूमिका घेतल्याने भाजपाबरोबरची युती तुटली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांनी एकत्र येत महाविकास आघाडी करून सत्तास्थापनेचा दावा केला. पण 23 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी राजभवनावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. पण सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीसाठी खुले मतदान घेण्याचा आदेश दिल्यावर दोघांनीही राजीनामा दिला.
आता शिवसेनेच्या बंडखोर 39 व अन्य 11 अशा 50 आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यावर ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर ओघाने भाजपा सत्तेसाठी दावा करेल, असेच चित्र होते. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी सागर या निवासस्थानी फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. विशेष म्हणजे, बिहारमध्येही भाजपाने हाच पॅटर्न वापरला आहे. तिथे 243पैकी 125 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाल्या. त्यात भाजपाच्या 74 तर, जनता दल युनायटेडच्या 43 जागा आहेत. पण तरीही तिथे जदयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत.
आता महाराष्ट्रात देखील भाजपाने हाच पॅटर्न अवलंबला आहे. आजच्या घडीला शिवसेनेकडे कमी जागा असतानाही त्याचा मुख्यमंत्री होत आहे. भाजपाचे एकूण 106 आमदार आहेत. शिवसेनेचे एकूण 55 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 39 शिवसेनेचे तर इतर 11 असे 50 आमदार असतानाही भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले आहे. विशेष म्हणजे, 2020मध्ये बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस होते.

मग उद्धव यांना का डावलले?
आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत. ही तत्त्वांची आणि हिंदुत्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताना सांगितले. सत्तेच्या पाठीमागे भाजपा नाही आणि हिंदुत्वाचा मुद्दा आहे, तर अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा मोठेपणा का दाखवला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.