घरमुंबईदादरच्या पुलाखालील सुशोभिकरणावर कोट्यवधींचा नियमबाह्य खर्च!

दादरच्या पुलाखालील सुशोभिकरणावर कोट्यवधींचा नियमबाह्य खर्च!

Subscribe

शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार हे काम कंत्राटदाराला बहाल करताना प्रशासनाने आजवरच्या सर्व नियमांना हरताळ फासला आहे.

दादर पूर्व येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपूलाखालील पाच भागांचे सुशोभिकरण करण्याचे कंत्राट मंजूर झालेले असतानाच त्याच कंत्राटदाराला निविदा न मागवता उर्वरीत तीन भाग आणि खोदादाद सर्कल वाहतूक बेटाच्या सुशोभिकरणाचे काम बहाल करण्यात आले. यापूर्वी मंजूर कामाच्या कंत्राटापेक्षा दुप्पट काम कंत्राटदाराला बहाल करण्यात आले आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार हे काम कंत्राटदाराला बहाल करताना प्रशासनाने आजवरच्या सर्व नियमांना हरताळ फासला आहे.

जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण व विकास करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने मार्च २०१९ मध्ये ३ कोटी ७३ रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते. कंत्राट कामांसाठी मानसी कंस्ट्रक्शनची निवड करण्यात आली होती. या कंपनीला मार्च २०१९ पासून ११ महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण करायचे होते. पुलाखाली आठ भाग आहेत. त्यातील पाच भागांच्या सुशोभिकरणासाठी पावणे चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. यामध्ये एमएसआरडीसीकडील दोन भाग व कचरा वर्गीकरण प्रकल्प वगळता उर्वरीत पाच भागांचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम ९५ टक्के पूर्ण झालेले असतानाच कंपनीला येथील अतिरिक्त काम बहाल करण्यात आले आहे. पुलाखालील कचरा वर्गीकरण प्रकल्प होऊ शकला नाही. त्यामुळे यासह उर्वरीत तीन भागांचे व खोदादाद सर्कलचे काम हाती घेण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. शिवाय हिंदमाता उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत टाटा मेमोरिअल तसेच आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक तसेच काही रुग्ण वास्तव्य करत असतात. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यास तसेच स्वच्छतेबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्याठिकाणी तारेचे कुंपण घालण्याच्या कामांचा समावेश करत वाढीव कामांचे कंत्राट त्याच कंपनीला देण्यात आले आहे. वाढीव कामांचे कंपनीला ४ कोटी ५० लाख देण्यात आले आहे.

- Advertisement -

कंत्राटदारावर मर्जी बहाल

कंपनीला वाढीव साडेचार कोटींचे काम देतानाच यापूर्वी जे काम मार्च २०१९ पासून ११ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्या कामासाठी कंत्राटदाराला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फायदा घेत ८ जून २०१९ पासून काम सुरु करण्यास परवानगी दिली. तसेच कोविड कालावधीतील दिवस व न केलेल्या कामांचे दिवस विचारात घेऊन हा कालावधी २७ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला. आता वाढीव कामांना जेव्हा कार्यादेश दिला जाईल तेव्हापासून चार महिन्यांच्या कालावधीत ही वाढीव काम करण्यास परवानगी दिली आहे.

सध्या झालेली कामे

संरक्षक भिंतीची बांधणी, अंतर्गत पदपथ, विविध प्रकारची बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, प्रवेशाद्वारे, वरिष्ठ नागरिकांसाठी बसण्याची जागा, योग विभाग, विद्युत कामे, मुलांकरता खेळणी व उद्यान, हिरवळीची उंचवटे तसेच पुलाखालील खांबांना व्हर्टीकल उद्यान विकसित करण्याची कामे ९५ टक्के पूर्ण झाली आहे.

- Advertisement -

कामाची गती कायम राहण्यासाठी निर्णय

हे काम सलग आहे. सध्या केलेल्या सुशोभिकरणात सलगता रहावी आणि त्याचे सौदर्य अजून खुलून दिसावे यासाठी त्याच कंपनीला हे काम दिले आहे. यामुळे सौदर्यात सलगता राहील आणि कामाची गतीही कायम राहील. सद्याचे काम हे २० टक्क्यापेक्षा कमी दरात दिले आहे. त्यामुळे निश्चितच हा खर्च कमी असल्याची माहिती उद्यान कक्षाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -