जैविक कचऱ्याचे रुग्णालयातच निर्जंतुकीकरण, १४ कोटींचा खर्च

केंद्र सरकारच्या अधिसूचनेवर पालिकेला साडेचार वर्षांनी जाग आली आहे. पालिका रुग्णालयात जैविक कचरा निर्जंतुकीकरणासाठी मायक्रोवेव्ह प्रणाली असणार आहे.

Medical Waste: Corona produces 38,680 metric tons of medical waste in India
Medical Waste: कोरोनाने देशात तयार झाला ३८,६८० मेट्रिक टन मेडिकल वेस्ट

मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालये येथे निर्माण होणारा जैविक कचरा ‘एसएमएस’ या कंपनीच्या मार्फत गोळा करून त्याची ज्वलनशील भट्टीत जाळून विल्हेवाट लावण्यात येते. वास्तविक, केंद्र सरकारने २०१६ रोजी एक अद्यादेश काढून जैविक कचरा रुग्णालयात निर्जंतुकीकरण करून मगच त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर गेले ४ वर्षे गप्प बसलेल्या मुंबई महापालिकेला उशिराने जाग आली आणि आता पालिकेच्या रुग्णालयात त्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

सदर प्रस्तावानुसार, पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात दररोज निर्माण होणारा रक्त नमुन्याच्या बाटल्या, मानवी शरीराचे भाग आदी प्रकारचा जैविक कचरा एसएमएस कंपनीच्या ज्वलनशील भट्टीत विल्हेवाट लावण्यासाठी जाण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा पुरवठा करणे, त्याची उभारणी करणे आणि त्याची चाचणी घेऊन ते कार्यान्वित करण्याचे तब्बल १४ कोटी रुपयांचे कंत्राटकाम मे. सन्मित इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. तीन कंत्राटदारांनी टेंडर प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यामध्ये मे. सन्मितचे दर सर्वात कमी असल्याने त्यास काम देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत साधकबाधक चर्चेअंती घेण्यात आला.

पालिकेच्या रुग्णालयात ४१ नग

मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा पुरवठा करण्यासाठी प्रति नग किमान ३४ लाख ५५ हजार रुपये याप्रमाणे कंत्राटदाराला १४ कोटी १६ लाख ५८ हजार ४६ रुपये पालिका मोजणार आहे. यामध्ये, प्रारंभी एका वर्षाच्या प्रचलन कामाचा खर्च ५३ लाख ७० हजार रुपये तर पुढील पाच वर्षांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये एवढा खर्च अंतर्भूत आहे.

जैविक कचऱ्याची रुग्णालयातच विल्हेवाट लावावी – राष्ट्रवादी काँग्रेस

पालिका रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे निर्जंतुकीकरण रुग्णालयातच करावे आणि त्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट तेथेच लावण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी केली.

तसेच, सध्या रुग्णालयातील जैविक कचरा ज्या एसएमएस कंपनीत विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला जातो त्या देवनार परिसरातील प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे रुग्णालयातील हा जैविक कचरा एसएमएस कंपनीत पाठवण्याचा वाहतूक व इतर खर्च वेगळा आणि या कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करण्याचा खर्च वेगळा होणार असल्याने ही आणखीन खर्चिक बाबा लक्षात घेता पालिकेने त्यापेक्षा त्या त्या रुग्णालयातच त्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी राखी जाधव यांनी केली. मात्र त्यानंतरही सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


हेही वाचा – बेस्टचा अर्थसंकल्प मंजूर न करता परत पाठवण्याचा निर्णय