घरताज्या घडामोडीमुंबईत बर्ड फ्ल्यूचा फैलाव? मृत कावळे, कबुतरांच्या रोज सरासरी १०३ तक्रारी!

मुंबईत बर्ड फ्ल्यूचा फैलाव? मृत कावळे, कबुतरांच्या रोज सरासरी १०३ तक्रारी!

Subscribe

राज्यात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या, कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या घटना घडत आहेत. तर मुंबईत गेल्या २४ तासांत कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या ३६ तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. गेल्या १० जानेवारीपासून ते आजपर्यंत म्हणजे एका महिन्यात शहर व उपनगरात कावळे, कबुतरे मृत पावल्याच्या ३ हजार १०८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र गेल्या एका महिन्यातील संख्या पाहता दररोज मृत कावळे, कबुतरे, चिमण्यांबाबत सरासरी १०३ तक्रारी पालिकेकडे येत असल्याचे समोर येत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र बर्ड फ्ल्यूमुळे काही प्रमाणात कावळे, कबुतरे यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

१० जानेवारीपासून तक्रारी वाढल्या!

वास्तविक, मुंबईत गेल्या ५ जानेवारीपासूनच चेंबूर, गिरगाव आदी भागात कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर येऊ लागल्या होत्या. मात्र १० जानेवारीपासून तक्रारींचा ओघ वाढला. त्यामुळे पालिकेच्या अधिकृत माहिती व आकडेवारीनुसार १० जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत कावळे, कबुतरे, चिमण्यांबाबत तब्बल ३ हजार १०८ तक्रारी आल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पालिकेकडे सरासरी १०३ तक्रारी येत असल्याचे सामोर आले आहे.

- Advertisement -

आता पालिकेला आणखीन जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. बर्ड फ्ल्यूमुळे मुंबईसह राज्यात कोंबड्यांच्या विक्रीवर, चिकन विक्रीवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते बर्ड फ्ल्यूबाबत काळजी घ्यावी मात्र चिकन नीटपणे शिजवून त्याचे सेवन करता येते. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील चिकन अर्धा तास शिजवून खाल्ल्यास बर्ड फ्ल्यूचा धोका नसतो, असं स्पष्ट केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -