भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदेंचे प्रत्युत्तर

bjp corporator prabhakar shinde slams yashwant jadhav on his claim bjp candidate join shivsena
भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदेंचे प्रत्युत्तर

भाजपचे १५ ते २० नगरसेवक आपल्या संपर्कात असून लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. परंतु भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचे फुसके बार सोडू नये असे प्रत्युत्तर मुंबई महानगरपालिका भाजप गटनेते आणि नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी दिलं आहे. भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नसल्याचे वक्तव्य प्रभाकर शिंदे यांनी केलं आहे.

मुंबई महानगरपालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपचे नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करणार हे फुसके बार स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सोडू नये. स्वप्नरंजन करायला काही पैसे पडत नाहीत. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षांनी स्वप्ने बघत राहावीत. मी सांगतो भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही असे खात्रीने सांगतो असे विरोधी पक्षनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे’.

भाजपचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे आणि असे फुसके बार सोडण्याची त्यांची जुनी सवय आहे. आता त्यांचा पक्ष उपऱ्यांच्या जोरावर चालत असून बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डावलले जात आहे. गेले २५ वर्षे युतीत असताना त्यांना जेव्हा जेव्हा उमेदवार सापडत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना लोकसभेसाठी, विधानसभेसाठी आणि महापालिकेसाठी सुद्धा उमेदवार दिलेले आहेत याची आठवण करून देत स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्यांना महापालिकेतही सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहेत असा सणसणीत टोला भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी सत्ताधार्‍यांना लगावला.

शिवसेनेला मतदारसंघात उमेदवार मिळत नसल्यामुळेच पालघर लोकसभा मतदारसंघासाठी राजेंद्र गावित, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सदाशिव लोखंडे, मध्य दक्षिण मुंबईसाठी विद्याधर गोखले, सातारा कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ताडदेव महापालिका प्रभागासाठी अनिल सिंग, अंधेरीतील नगरसेविका संध्या सुनिल यादव असे ३५ ते ४० उमेदवार वेळोवेळी दिलेले आहेत. आताही शिवसेनेला योग्य उमेदवारांची वानवा आहे म्हणूनच ते फोडाफोडीची भाषा करित आहेत. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केला.


हेही वाचा : महापालिकेतील नेतृत्वावर भाजप नगरसेवक नाराज, लवकरच करणार शिवसेनेत प्रवेश