Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लोकल प्रवेश द्या, अन्यथा पाच हजार प्रवास भत्ता द्या, भाजपची मागणी

लोकल प्रवेश द्या, अन्यथा पाच हजार प्रवास भत्ता द्या, भाजपची मागणी

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत्या रूग्णसंख्येमुळे सर्वसामान्यांसाठी बंद असलेली मुंबई लोकलची सेवा पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुली करावी अशी मागणी आज सोमवारी भाजपकडून करण्यात आली. लोकल प्रवेश देणार नसाल तर दरमहा ५ हजार रूपये द्यावेत अशीही मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. मुंबईतील खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना तसेच लसीकरणासाठी येणाऱ्यांना लोकल प्रवेशाची मागणी भाजपने केली आहे.

खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. तर राज्य सरकारने मुंबई आणि उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तात्काळ परवानगी द्यावी अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.

- Advertisement -

डोंबिवली आणि कल्याणहून मुंबईत खासगी वाहनाने यायचे असेल तर लोकांना साधारण ७०० रुपये मोजावे लागतात. मुंबईत सध्या करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी आणि लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही तसे पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता रेल्वे खाते आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, असे दरेकर म्हणाले. तर राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे, असे उपाध्ये यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे, असे उपाध्ये म्हणाले. लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये राखून ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत आणि सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले. दरम्यान, नाना पटोले यांच्या पाळतीच्या वक्तव्यावर बोलताना दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांत विसंवाद जनतेसमोर येत आहे. हे सरकार राज्यातील जनतेच्या मनातून उतरले आहे, असे ते म्हणाले.


- Advertisement -

 

- Advertisement -