‘मुंबईत चाचण्या वाढवण्याची नितांत गरज’; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra fadnavis criticized cm uddhav thackeray says he is trying to change constitution
Devendra fadnavis criticized cm uddhav thackeray says he is trying to change constitution

देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे, ही मागणी करणारे आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

काय म्हणाले माजी मुख्यमंत्री पत्रात 

सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्यानेच पुन्हा एकदा आग्रह आहे की, मुंबईत चाचण्यांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन ६ हजार ५७४ चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा ४.९१ टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत म्हणजेच १७ ऑगस्टपर्यंत प्रतिदिन ७ हजार ००९ चाचण्या करण्यात आल्या. या १७ दिवसांचा मृत्यूदर हा ५.४० टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन ७ हजार चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता १.९२ टक्क्यांवर आला आहे, असे असताना मुंबईचा मृत्यूदर सातत्याने ५ टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक आहे.

महाराष्ट्राचा मृत्यूदर जून महिन्यात ५.२० टक्के इतका होता. तो जुलैमध्ये २.८९ टक्के झाला आणि आता ऑगस्टच्या १७ दिवसांत तो २.८९ टक्के इतका पुन्हा कायम आहे. आतापर्यंतच्या एकूण सर्व आकडेवारीचा विचार करता महाराष्ट्राचा मृत्यूदर हा ३.३५ टक्के इतका आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता देशातील संसर्गाचे प्रमाण हे ८.८१ टक्के इतके असून, ते महाराष्ट्रात १८.८५ टक्के, तर मुंबईत १९.७२ टक्के इतके आहे. एकिकडे संसर्गाचे प्रमाण अधिक आणि दुसरीकडे सातत्याने वाढणारा मृत्यूदर पाहता चाचण्यांवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणे, रूग्ण ओळखणे, त्यातून विलगीकरण आणि अन्य नागरिकांना सुरक्षित ठेवणे हा एकमात्र उपलब्ध पर्याय आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा –

फेरिवाल्यांसाठीच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेत मच्छी विक्रेत्यांचाही समावेश