Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी टिपू सुलतान नामकरण प्रकरणात भाजपचा दुटप्पीपणा; महापौरांचा आरोप

टिपू सुलतान नामकरण प्रकरणात भाजपचा दुटप्पीपणा; महापौरांचा आरोप

टिपू सुलतान नामकरणावरून शिवसेनेला टार्गेट करणारी भाजप दुटप्पी वागत असून शिवसेनेला नाहक बदनाम करत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.

Related Story

- Advertisement -

गोवंडी येथील निर्माणाधिन उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्याबाबत समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप नगरसेवकांत नुकत्याच पार पडलेल्या बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत वादाची ठिणगी पडली. नामकरणावरून भाजपने शिवसेनेवर जहरी टीका केली होती. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. २०१३ मध्ये शिवसेना व भाजप यांची युती असताना गोवंडी भागात एका अपक्ष नगरसेवकाने रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याची मागणी केली असताना भाजपचे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनीच त्यास अनुमोदन दिले होते, अशी पोलखोल करत आता टिपू सुलतानच्या नावाला भाजपचा विरोध का? असा सवाल महापौरांनी केला.

टिपू सुलतान नामकरणावरून शिवसेनेला टार्गेट करणारी भाजप दुटप्पी वागत असून शिवसेनेला नाहक बदनाम करत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. गोवंडी विभागात समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, महापालिकेच्या उद्यानाला ‘टिपू सुलतान उद्यान’ असे नाव देण्याची मागणी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत जानेवारी २०२१ रोजी केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय देत त्याबाबतचा प्रस्ताव बाजार व उद्यान समितीच्या मंजुरीसाठी पाठवला होता.

- Advertisement -

गुरुवारी बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावावरून मोठा गदारोळ झाला. भाजप नगरसेवकांनी सदर प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली, तर शिवसेनेने सदर प्रस्ताव अपूर्ण असल्याचे कारण देत तो परत प्रशासनाकडे पाठवला. त्यावरून भाजप नगरसेवकांनी समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांना दालनात जाऊन घेराव घातला. त्यामुळे समितीची बैठक तहकूब करण्यात आली. तर भाजप नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला होता.

तसेच शिवसेनेने समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेच्या मागणीला समर्थन देऊन लाचारी केली, असा आरोप केला होता. त्यामुळे संतप्त महापौरांनी आज टिपू सुलतानबाबतचे जुने प्रकरण उकरून काढून भाजपवर आगपाखड केली. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, असे त्यांनी भाजपला सुनावले.
- Advertisement -