घरताज्या घडामोडीगटनेत्याऐवजी भाजपने विरोधी पक्षनेत्याचे नाव सारले पुढे

गटनेत्याऐवजी भाजपने विरोधी पक्षनेत्याचे नाव सारले पुढे

Subscribe

महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपाने दावा केला असून याकरता प्रभाकर शिंदेचे नाव जाहिर करण्यात आले आहे.

‘मुंबई महापालिकेत आम्ही पहारेकरीच राहू’, असे म्हणार्‍या भाजपने शिवसेनेशी फाटताच अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे. त्यामुळे भाजप गटनेते पदाची निवड करून त्यांचे नाव थेट महापौरांकडे पाठवण्याऐवजी त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांचे नाव जाहीर करून महापौरांना त्यांचे पत्र दिले आहे. तर पक्ष गटनेतेपदी निवड झालेल्या विनोद मिश्रा यांचे पत्र मात्र, महापौरांकडे पाठवण्यात आले नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांचे पत्र पाठवून भाजपने हा तिढा वाढवला, अशाप्रकारची मागणी मान्य करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने आधी त्यांना पक्षाचे गटनेते म्हणून जाहीर करूनच नंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करावा लागणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची निवड वादाची ठरण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरुन होणार वाद

मुंबई भाजपाचे महामंत्री आणि आमदार सुनील राणे यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रकाद्वारे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे महापालिका गटनेते खासदार मनोज कोटक यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक गटाची कार्यकारिणी घोषित केली. यामध्ये महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी भाजपचे मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०६ चे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची निवड केल्याचे जाहीर केले. तर महानगरपालिका गट भाजपच्या नेते पदी मालाडमधील विनोद मिश्रा यांची निवड केली आहे. तसेच पक्षाच्या उपनेता पदी जोगेश्वरीच्या नगरसेविका उज्वला मोडक आणि दक्षिण मुंबईतील नगरसेविका रिटा मकवाना यांची निवड करण्यात आली आहे. शिवाय महानगरपालिका गट मुख्य प्रतोद पदी सुनिल यादव यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय महानगरपालिका गटाचे प्रभारी म्हणून भालचंद्र शिरसाट यांची निवड करण्यात आल्याचे भाजपने जाहीर केले. विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांची निवड झाल्यामुळे, यासंदर्भातील पत्र भाजपने महापौर किशोरी पेडणेकर यांना पाठवले आहे.

- Advertisement -

भाजपच्या अंगलट येणार खेळी

महापालिकेतील नगरसेवकांच्या गटांचा नेता म्हणून प्रथम गटनेतेपदाची निवड पक्षाला करावी लागते. महापालिकेत अशाप्रकारे थेट विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्याचे कोणतेही आयुध संसदीय कार्यप्रणालीत नाही. त्यामुळे गटनेतेपदी निवड आधी न करता थेट विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची भाजपची खेळी त्यांच्या अंगलट होण्याची शक्यता आहे.

काय होवू शकते?

विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांचे नाव दिल्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा सत्ताधारी शिवसेना आणि पर्यायाने महापौर अधिनियमांच्या आधारे फेटाळू शकतात. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांना मान्यता देण्याऐवजी पक्षाने आपला गटनेता कोण आधी स्पष्ट करावे,अशी विचारणा महापौर करू शकतात. त्यामुळे नियमांच्या आधारे भाजपला भविष्यात विरोधी पक्षनेतेपदाचा दावा तुर्तास बाजुला ठेवून गटनेतेपदाची घोषणा करून घ्यावी लागणार आणि गटनेतेपदाची निवड जाहिर झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याबाबतचा विचार सभागृह करू शकते.

- Advertisement -

विरोधी पक्षनेतेपदासाठी पाडावा लागणार कायद्याचा किस

विरोधी पक्षनेतेपदावर प्रबळ दावेदारी असतानाही भाजपने फेब्रुवारी २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पहारेकरी म्हणून भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली. त्यामुळेच दुसर्‍या क्रमांकाचे नगरसेवक संख्या असलेल्या काँग्रेस पक्षाचे गटनेते रवी राजा यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. त्यामुळे सध्या भाजपने नाकारल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेले आहे. ही निवड पुढील सार्वत्रिक निवडणुकीचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत असते. त्यामुळे आजच्या घडीला विरोधी पक्षनेते अस्तित्वात असताना, त्यांना बाजुला करून नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड कोणत्या आधारे करायची यासाठी आता कायद्याचा किस पाडावा लागणार आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष सहजासहजी भाजपला विरोधी पक्षनेतेपद बहाल करणार नसल्याने पक्षाला यासाठी न्यायालयात दाद मागूनच हक्क मिळवावा लागेल,असे चित्र सध्या तरी दिसत आहे. दरम्यान, वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची वर्णी लागल्यास भाजपकडे हे पद अलगद येण्याचीही शक्यता आहे.

घाईगडबडीत निर्णय नाही

महापालिका चिटणीस विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार,अशाप्रकारची घटना प्रथमच घडत आहे. त्यामुळे जुन्या सर्व आधारांचा अभ्यास केला जात आहे. परंतु, यामध्ये नेमकी भूमिका आता स्पष्ट होणार नाही आणि यावर घाईगडबडीत निर्णयही देता येणार नाही. कारण अशाप्रकारचा घेतलेला निर्णय हा भविष्यात एकप्रकारे प्रथा ठरेल,असे त्यांनी म्हटले आहे.

एकाच पदासाठी दोघांची निवड कशी केली जाऊ शकते. भाजपने, हे पद नाकारल्यानेच माझी निवड विरोधी पक्षनेतेपदी झाले आहे. ही निवड पुढील पाच वर्षांसाठी आहे. मग आता ते कसे मागू शकतात. त्यांनी हे पद दिल्यामुळेच आम्हाला हे पद मिळाले आहे. त्यामुळे त्यांची मागणी निरर्थक आहे.  – रवी राजा, विरोधी पक्षनेते,मुंबई महापालिका

महापालिकेतील नगरसेवक संख्याबळ

शिवसेना – ९६
भाजपा – ८३
काॅग्रेस- ३०
राष्ट्रवादी काँग्रेस – ८
सपा – ६
मनसे – १
एमआयएम – २


हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर; पुढच्या २० दिवसांत पीक विम्याची रक्कम मिळणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -