‘रोज उचलली जीभ लावली टाळ्याला’, आशिष शेलार यांची राऊतांवर टीका

ashish shelar slams sanjay raut on ed cbi investigation
भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत असल्याने संजय राऊतांची कोल्हेकुई, आशिष शेलारांचा हल्लाबोल

केंद्राने मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार?, असे ट्विट करत हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. “देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार? सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल. तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या? हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला अशा आशयाचे ट्विट शेलार यांनी केले आहे. दरम्यान आशिष शेलार यांनी आणखी एक ट्विट करत “मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार? मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा”, असे देखील शेलार यांनी विचारले. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या असेही ते म्हणाले आहेत. केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

नेमके काय म्हणाले होते संजय राऊत? 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले होते. तसेच आता मुंबईसाठी वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. लाखो मजुरांनी मुंबईतून स्थलांतर केले असून, मुंबईत त्यांचे पोट भरत नसल्याने ते आपापल्या राज्यात निघून गेल्याचे त्यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी मुंबईसारख्या शहरांचे महत्त्व टिकवणे गरजेचे असल्याचे सांगत देशाच्या आर्थिक राजधानीचे महत्त्व टिकवणे महत्त्वाच असल्याचे म्हटले होते. तसेच मुंबईचे आर्थिक महत्त्व देशात आणि जगात टिकणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे मुंबईतून २० ते २५ क्के महसूल देशाच्या तिजोरीत जमा केला जातो. त्यामुळे फक्त मुंबईच नाही तर मुंबईसारख्या शहरांसाठी आर्थिक पॅकेज देणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते.