कधी नव्हे ते एवढं बहुमत महायुतीला मिळालं आहे. भाजप, शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस ( अजितदादा पवार ) आणि सहयोगी पक्षांना तब्बल 230 हून अधिक जागा मिळाल्या आहेत. पण, बहुमत मिळाल्यानंतरही 10 दिवस झाले सत्तास्थापन न झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. अखेर 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार आहे.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास महायुतीचे नेते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 48 तासांत नवीन सरकार स्थापन होईल.
हेही वाचा : भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
मात्र, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फक्त भाजपचे नेते जाणार का? एकनाथ शिंदे, अजितदादा पवार उपस्थित राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, दोन दिवसांपासून अजितदादा पवार हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. मात्र, अद्यापही अमित शहा यांनी अजितदादांना भेटीसाठी वेळ दिली नसल्याची माहिती समोर येत आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्यानं त्यांनी महायुतीच्या बैठकांना हजेरी लावली नव्हती. परंतु, शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
पण, सत्तास्थापन करण्यासाठी महायुतीचे नेते, राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. या भेटीवेळी एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपस्थित राहणार का? असा सवाल विचारला जात आहे.
हेही वाचा : राऊतांनी उल्लेख केलेला गजाभाऊ कोण? वाचा सविस्तर…