आडनाव बघून अनधिकृत बांधकामावर कारवाई, आशीष शेलार यांची टीका

गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, घराशेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे, अशी टीका करताना आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप शेलार यांनी केला.

Ashish Shelar slams shivsena over bjp polkhol abhiyan vehicle attack and shivsena agnry over rana

राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघाले आहे.  तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाल्या आहेत. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे अशा शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकावर टीका केली. अनधिकृत बांधकामावरील कारवाई ही आडनाव बघून केली जात आहे,  असा आरोपही त्यांनी केला.

शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचे काम आहे. पण गेल्या २५ वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, घराशेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे, अशी टीका करताना आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरे  तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केले नाही का? हा जाती, धर्मभेद नाही, तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे. आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनाव बघून केली जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरु करणार असल्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, योगींनी उत्तर प्रदेशात लता मंगशेकरांच्या नावे चौक केला. मग हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान नाही का? अयोध्येतील नगरपालिकेला जागा ठरवून लता मंगेशकरांचा सन्मान करा हे सांगणारे भाजपचे सरकार आहे. मुंबईत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम झाला आणि श्रद्धांजलीसाठी हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरी वाजवली. केंद्र सरकारच्या संस्कृतिक  विभागाने यासाठी मदत केली आणि महाराष्ट्र सरकार झोपून होते. शिवसेनेचा मराठी मुद्दाही गेला आहे आणि हिंदुत्वाशी संबधही राहिलेला नाही,अशी टीकाही शेलार यांनी केली.