HomeमुंबईThackeray Vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात...

Thackeray Vs BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही; बावनकुळेंची जहरी टीका

Subscribe

मुंबई – बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे सुरक्षित नाही, आणि मुंबईत देखील मंदिरे सुरक्षित नाहीत, भारतीय जनता पक्षाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरते आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींनी मंदिरांच्या सुरक्षेवर भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आज केली. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची औकात नाही, अशी जहरी टीका केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मंदिरांवर होणारे हल्ले यावरुन विश्वगुरु काय करत आहेत? असा सवाल केला. तसेच बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत, असंही ठाकरे म्हणाले. यावर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी जोरदार टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.
पंतप्रधानांचे व्याप खूप मोठे आहे. त्यांना जगभर फिरावे लागते, त्यामुळे त्यांना बांगलादेशातील हिंदूचे अत्याचार दिसले नसतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लागवाला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमावरुन उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले की, “ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली”.

बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती, अशी टीका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली.

हिंदुत्वाबद्दल बावकुळे काय म्हणाले?

हिंदुत्वाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका, तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही,
यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते,” असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला.
तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच, पण तुमची ती लायकी देखील नाही, अशी जहरी टीका बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

बाटग्यांनी आमच्यावर बोलू नये – प्रसाद लाड

उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही बोचरी टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले की, बाटग्यांनी आमच्यावर बोलू नये. उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांची टोपी घातली आहे. आता त्यांनी संध्याकाळी सहाची नमाज पठण कुठे करणार ते सांगावे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Uddhav Thackeray : दादर स्थानकातील हनुमान मंदिराला रेल्वे मंत्रालयाकडून नोटीस; हेच भाजपचे हिंदूत्व आहे का?

Edited by – Unmesh Khandale