Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई शिवसेनेला वचनपूर्तीची आठवण करून देण्यासाठी भाजपची मूक निदर्शने

शिवसेनेला वचनपूर्तीची आठवण करून देण्यासाठी भाजपची मूक निदर्शने

भाजपवाल्यांचे मगरीचे अश्रू - यशवंत जाधव

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत मुंबईकरांना जी वचने दिली त्यांची पुर्तता करण्यात यावी, याची आठवण करून देण्यासाठी भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयासमोरील ‘सेल्फी पॉईंट’ च्या ठिकाणी मूक निदर्शने करण्यात आली. यक निदर्शनास, भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेवक अभिजित सामंत, प्रभारी भालचंद्र शिरसाट, अतुल शाह, प्रकाश गंगाधरे, नगरसेविका शितल गंभीर –देसाई, समिता कांबळे, नेहल शाह, बिंदू त्रिवेदी, कृष्णावेनी रेड्डी, सुरेखा लोखंडे आदी नगरसेवक उपस्थित होते.

मुंबई महापालिकेत १९९६ ते २०२१ अशी सलग २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्याकडेच मुंबईचे महापौरपद आहे. मात्र शिवसेनेने पालिका निवडणुकीत मुंबईकरांना ५०० चौ. फुटांच्या घरांचा मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करणे, सातशे चौरस फुटापर्यंत मालमत्ता करात सवलत, खड्डे विरहीत रस्ते, डबेवाला भवन, मराठी भाषा उभारणे, २४×७ पाणी पुरवठा करणे,दर्जेदार रुग्णालये, बेस्ट उपक्रमाचे विलिनीकरण, मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी उपाययोजना करून पूरपरिस्थितीपासून दिलासा देणार आदी वचने वचननाम्यात दिली होती त्या वचनांची आठवण करून देण्यासाठी आणि त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासाठीच आज भाजपा नगरसेवकांनी मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील सर फिरोजशाह मेहता पुतळ्यासमोर मूक निदर्शने केली, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

सत्ताधारी शिवसेनेचे नेते जाहीर सभांमध्ये ‘जे बोलतो ते करतो’ असे छातीठोकपणे सांगतात ; मात्र, तब्बल २५ वर्ष उलटूनही मुंबईकरांच्या हाल-अपेष्टा संपलेल्या नाहीत. मात्र याचवेळी धनदांडग्यावर करामध्ये सवलतींचा वर्षाव करत महापालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर १६ वर्षांत वीस हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपये पुरनियंत्रणासाठी खर्च केल्यानंतरही व दरवर्षी नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्चूनही मुंबईची तुंबई होते आणि त्यामुळे मुंबईकरांना त्याचा त्रास होतो, अशी खंत गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

भाजपवाल्यांचे मगरीचे अश्रू : यशवंत जाधव

- Advertisement -

शिवसेनेने निवडणुकीत जी वचने दिली त्यांची पूर्तता करीत आहे. काही बाबी झाल्या आणि काही प्रगतीपथावर आहेत. ५०० चौ. फुटांच्या घरांबाबतचा निर्णय हा तत्कालीन भाजप सरकारमुळे आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांमुळेच रखडला होता. आता हे भाजपवाले पालिकेसमोर रडगाणे गात आहेत, नौटंकी करीत आहेत. ही त्यांची भावनाशिलता, जनतेप्रति संवेदना वगैरे काहीही नसून हे यांचे मगरीचे अश्रू आहेत असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे. फक्त येनकेन प्रकारे प्रसिद्धीत राहायचे, वरिष्ठ नेत्यांना दाखवायचे बघा आम्ही येथील सत्ताधाऱ्यांना हलवले आणि वरिष्ठांची मर्जी राखायची, यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.

गॅसचे दर गगनाला भिडलेत, महागाई वाढली, त्यात पेट्रोलचे भाव वाढलेत. त्याचा मोठा फटका सामान्य जनतेला बसत आहे. पण यांच्या नेत्यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीप्रसंगी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करून देण्याचे वचन दिले होते, त्याचे काय झाले ? त्याबाबत जनतेने विचारणा केली तर भाजपचे नेते म्हणतात, तो चुनावी जुमला होता.

कोट्यवधी बेरोजगार जनतेला नोकऱ्या उपलब्ध करणार होते, त्याचे काय झाले ? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारटा ? या भाजपच्या घाणेरड्या राजकारणामुळे आणि कामगार विरोधी धोरणांमुळे कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. महागाई वाढली आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. तसेच, आम्ही आमची वचने पूर्ण करणारच. मात्र आम्ही काय कामे करावीत, काय करू नये, हे भाजपने सांगण्याची गरज नाही.त्यांनी स्वतःच्या बुडाखाली काय जळतय ते बघावे. शेवटी एवढेच की, “दुसरोंके महल पर पत्थर मारनेवाले पहले अपने कांच के महल को संभाले

- Advertisement -