नालेसफाईच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका – विरोधी पक्षनेते रवी राजा

ravi raja bmc congress

मागील दोन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील अनेक भागात पाणी साचल्याने मुंबईतील नालेसफाई झाली नसल्याचा आरोप खरा ठरला आहे. यापूर्वी आपण नालेसफाई झाली नसल्याचे पुरावे तळातील गाळ दाखवत दिले होते. ते आरोप या पावसात खरे ठरले असून आता तरी प्रशासनाने नालेसफाई झाली नसल्याचे मान्य करून या सफाई कामाची चौकशी करावी, अशी मागणी महापलिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच त्यांना काळया यादीत टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असेही त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

मागील चार दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसात मुंबईतील सातही परिमंडळांच्या क्षेत्रात अनेक भागांत पाणी साचले होते. त्यामुळे संपूर्ण मुबई जलमय झाली. पण तुंबलेले पाणी ज्या वेगाने जमा झाले, त्यानंतर त्याचा निचरा योग्य प्रकारे झाले नाही. परिणामी मुंबईकरांचे मोठे हाल झाले. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली झाली. या वर्षी नालेसफाईवर ९० कोटी रुपये खर्च करूनही अनेक भागात पाणी तुंबले.

महापालिकेने कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देऊनही कंत्राटदारांनी नाल्यातील गाळ न काढता त्यातील केवळ तरंगता कचराच साफ केला आहे.तसेच जो कचरा नाल्यातून बाहेर काढला तो नाल्याच्या बाजूलाच ठेवला आहे. तो कचरा पुन्हा नाल्यात गेला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामावर खर्च केलेला निधी वाया गेल्याचा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. त्यामुळे महापलिका करदात्यांना आवश्यक सुविधा देऊ शकलो नाही ही गंभीर बाब असून सातही परिमंडळांच्या कंत्राटदाराना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राजा यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.