घोड्याच्या मुत्राशयाला कर्करोगाची गाठ; परळच्या बैलघोडा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

घोड्याच्या मुत्राशयाला कर्करोगाची गाठ झाली होती. यावर परळच्या बैलघोडा हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

bladder of the horse had cancerous successful surgery at Bailgoda Hospital in parel
बैलघोडा हॉस्पिटल

परळच्या बैलघोडा या पशुवैद्यकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी घोड्याच्या मुत्राशयाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याला जीवदान दिलं आहे. खरंतर, अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचं प्रमाण कुत्र्यांमध्ये जास्त आहे. त्यामुळे, घोड्यावर अशा पद्धतीने शस्त्रक्रिया करणं वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जात आहे. काही दिवसांपूर्वी घोड्याच्या मुत्राशयाजवळ जखम वाटणारी गाठ ही कर्करोगाची असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. ती गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे, त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करत त्याला जीवदान देण्यात यश आलं आहे.

हा घोडा सात वर्षांचा असून सध्या पशुवैद्याच्या निरीक्षणाखाली असल्याचे सांगण्यात आले. या जागेवरील कर्करोग सर्रास कुत्र्यांमध्ये आढळतात. पण, घोड्यावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली असल्याचे पशुवैद्यकीय – डॉ. शाहिर गायकवाड यांनी सांगितले आहे.

असे आले उघडकीस

कल्याणच्या खडवलीतील शिवनिकेतन ट्रस्टच्या भारतीय सैनिकी विद्यालयातील घोड्याच्या अवघड ठिकाणी दिसणारी ती गाठ जखम असल्याचे प्रथम दर्शनी भासत होती. पण, त्या गाठीची तपासणी केल्यानंतर कर्करोगाची गाठ असल्याचे निदान झाले. या दरम्यान घोड्याच्या हालचालीत बदल आणि शिथिलता दिसून येत होती. त्यामुळे, या घोड्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी तीन किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली. सध्या घोडा निरीक्षणाखाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. पाच तास चाललेली ही शस्त्रक्रिया मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे डॉ. गजेंद्र खांडेकर, डॉ. संतोष त्रिपाठी, डॉ. शाहिर गायकवाड, डॉ. सचिन राऊत यांनी केली. शस्त्रक्रियेनंतर ठराविक कालावधीतच घोडा मुत्रविसर्जनही करू लागला असल्याचे सांगण्यात आले.

हा घोडा सहा ते सात वर्षांचा असून नसबंदी केलेला प्रौढावस्थेतील आहे. घोड्याला कर्करोगाची लागण झाल्याची कारणे बरीच असू शकतात. पण, अवघड ठिकाणी गाठ असल्याने अर्धे लिंग कापून लघवीसाठी जागा करण्यात आली, अशा शस्त्रक्रिया कुत्र्यांमध्ये सर्रास करण्यात आल्या आहेत. घोड्यांमध्ये प्रथमच ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. – डॉ. गजेंद्र खांडेकर, शल्यचिकित्सा शास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय (परळ)


हेही वाचा – मुंबईतील दुकाने,हॉटेल्स,केमिस्ट रात्रीचीही खुली ठेवा! – काँग्रेस