घरताज्या घडामोडीपालघरजवळ बोईसरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट

पालघरजवळ बोईसरमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट

Subscribe

बोईसर एमआयडीसीमध्ये तारा नायट्रेट नावाच्या एका रसायनाच्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

पालघरजवळ बोईसरमध्ये एका रसायनाच्या कंपनीमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपासच्या मोठ्या परिसरात भूकंपसदृश धक्के बसल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. तारापूरच्या एमआयडीसीमधील तारा नायट्रेट या कंपनीत रसायनाचा भीषण स्फोट झाला. या अपघातात ३ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे या स्फोटामुळे आसपासच्या २ ते ३ कारखान्यांना देखील आग लागल्याचं म्हटलं जात आहे. कोलवडेजवळच्या कंपनीत हा स्फोट झाला आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये तारा नायट्रेट कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांच्यासह २ कामगार मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अनेक कामगार अजूनही दुर्घटनास्थळी आत अडकल्याची माहिती आहे.

दरम्यान, या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत सरकारच्या वतीने घोषित करण्यात आले असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनाला दिले आहेत. बचावकार्यामध्ये एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज स्फोटाची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली, तसेच यामधील बचाव कार्याला आणि जखमींच्या उपचारांना प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.

या स्फोटामुळे कंपनीच्या आवारतील एक इमारत कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. तारा नायट्रेट कंपनीतीळ नव्या इमारतीत असलेल्या बॉयलर रिअॅक्टरची चाचणी सुरु असताना अचानक हा स्फोट झाला. स्फोटामुळे कंपनीची इमारतही कोसळली. कंपनीची दुसरी पाळी सुरु होती. त्यामुळे आतमध्ये ८० कामगार काम करीत होते. नेमका त्याचवेळी हा स्फोट झाल्याने अनेक कामगार दगावले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीचा रखवालदार आपली पत्नी आणि दोन मुलांसह कंपनीच्या आवारात असलेल्या घरात रहात होता. स्फोटात ते घर कोसळल्याने चौघेही मृत्युमुखी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. पण, तीसहून अधिक कामगार मृत्युमुखी पडले असावेत असे सांगण्यात येते. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या मदत कार्य करीत आहेत. तर मृत आणि जखमींच्या माहितीसाठी बारा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. तारा नायट्रेट कंपनीच्या स्फोटाच्या झळा शेजारी असलेल्या गॅलेक्सी, विकास केमिकेल या दोन कंपन्यांना बसली. या तिन्ही कंपन्यांमध्ये आग लागली. तसेच या परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांचेही नुकसान झाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -