घरी रक्तदाब मोजणार्‍या उपकणांचे रीडिंग चुकीचे

रुग्णांकडून वाढताहेत तक्रारी; काळजी घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

घरच्या घरी रक्तदाब मोजण्याची उपकरणे रुग्णांना रक्तदाब तपासण्यासाठी सोयीस्कर वाटत असली, तरी याद्वारे अचूक रक्तदाब मोजला जाईल याची हमी अनेकांना हवी आहे. घरी घेतलेल्या रक्तदाबाच्या रिडिंगमध्ये व डॉक्टरांकडील रिडिंगमध्ये तफावत दिसून येत असल्याने घरातील उपकरणांमध्ये दोष असावा अशी शंका उपस्थित होते. त्यामुळे तुम्ही घरीच रक्तदाब मोजत असाल, तर तो अचूक मोजला न जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन जर्नल ऑफ हायपरटेन्शन या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, घरी रक्तदाब मोजण्यासाठीची ७० टक्के उपकरणे सदोष व अचूक मापन न करणारी आहेत आणि याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे घरातल्या उपकरणाने केलेल्या मापनावर पूर्ण अवलंबून न राहता नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

घरी रक्तदाब मोजल्यानंतर येणारे वाचन अचूक नसते अशी तक्रार माझ्याकडील रुग्णांपैकी १० टक्के रुग्ण करतात. रुग्णांना त्यांच्या रीडिंग्जमध्ये चढउतार दिसून येतात. हे रीडिंग्ज अचूक नसल्याचे निदर्शक आहे. म्हणूनच, हायपरटेन्शन सोसायटी ऑफ ब्रिटिश आणि जागतिक आरोग्य संघटनेने पडताळणी केलेली उपकरणेच वापरा, अशी शिफारस मी रुग्णांना करत असल्याचे मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील इंटरनेट मेडिसिन तज्ज्ञ डॉ. बेहराम पारडीवाला यांनी सांगितले. घरातील व क्लिनिकमधील रीडिंग्जमध्ये तफावत असेल तर डॉक्टरांना दाखवा. शिवाय, तुम्ही डॉक्टरांकडून मशिन नीट बांधणे शिकून घेतले पाहिजे, हाताची योग्य स्थिती कोणती व मशिन किती काळ लावायचे याचा नीट सराव केला पाहिजे. रक्तदाब मोजण्यापूर्वी ३० मिनिटे कॅफिनयुक्त पेये व धूम्रपान टाळा, असेही त्यांनी सांगितले.

घरी वापरण्याच्या रक्तदाब मापकाची रीडिंग्ज चुकीची किंवा अचूक आहेत की नाही हे बघण्यासाठी तुम्ही क्लिनिशिअनच्या उपस्थितीत रक्तदाब मोजला पाहिजे. यामुळे तुम्हाला त्यातील तफावत समजून घेण्यात मदत होईल. रक्तदाब मोजण्याच्या दोन पद्धती आहेत. एकीमध्ये आडवे होऊन उताण्या अवस्थेत रक्तदाब मोजला जातो, तर दुसरीमध्ये बसून मोजला जातो. रक्तदाब मोजत असताना हे यंत्र नीट बांधले गेले आहे की नाही याची खात्री करा, म्हणजे रीडिंग्ज अचूक येतील. रक्तदाब हाताचा घेर (परीघ) आणि मनगटाची पट्ठी यांनुसारही बदलतो. मनगट खूप घट्ट ताणल्यास रक्तदाब वाढू शकतो आणि मनगट जेवढे मोठे तेवढ्या चुकीची रीडिंग्ज येण्याच्या शक्यता वाढतात. एकदा उपकरणाची पडताळणी क्लिनिशिअनने करून दिली की घरच्या घरी रक्तदाबाचे अचूक मापन करता येते, असे डोंबिवलीच्या एसआरव्ही ममता हॉस्पिटलमधील जनरल फिजिशिअन डॉ. दीपक बुख्तार यांनी सांगितले.

रक्तदाबामुळे हृदयविकारात ३० टक्क्यांनी वाढ
बदलत्या जीवनशैलीने तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढल्याने भारतामध्ये हृदयविकारांमध्ये वाढ झाली आहे. रक्तदाब जितका अधिक; तितकीच हृदयविकाराचा झटका किंवा हृदय बंद पडण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावे लागते. त्यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती घडत असते. याचा थेट परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यात होतो. भारतामध्ये उच्च रक्तदाबग्रस्त लोकांची संख्या २० ते ४० टक्के दराने वाढून वर्ष २०३० पर्यंत २१.४ कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून दरवर्षी २५ ते ३० टक्के हृदयविकार वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ञ डॉ. महेश घोगरे यांनी दिली.

सिस्टॉलिक रक्तदाब १४०हून अधिक व डायस्टॉलिक रक्तदाब ९० हून अधिक असल्यास त्या अवस्थेला हायपरटेन्शन असे म्हणतात. शहरी लोकसंख्येत हायपरटेन्शनचे प्रमाण ३० टक्के तर ग्रामीण लोकसंख्येत २०-२२ टक्के आहे. हायपरटेन्शनच्या रुग्णांनी घरी रक्तदाबाचे मापन करणे, काही वेगळे आढळल्यास डॉक्टरांकडे तत्काळ जाणे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम, योगासने केल्यास फायदा होतो. तसेच रक्तदाबासाठी दिलेली औषधे नियमितपणे व वेळेवर घेणे गरजेचे आहे.
– डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिस सर्जन, रिलायन्स फाउंडेशन