घरCORONA UPDATE'अंधेरी-जोगेश्वरी पश्चिममध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी प्रशासनच जबाबदार'

‘अंधेरी-जोगेश्वरी पश्चिममध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी प्रशासनच जबाबदार’

Subscribe

विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिम विभागात आता झपाटयाने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली असून या विभागाने आता हेल्पलाईनद्वारे संशयित रुग्णांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला आहे. विभाग कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे हा शोध घेण्यात येत असून कोणाही व्यक्तीला कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्यास किंवा कुणाला ताप आल्यास या हेल्पलाईनवर कळवण्याचे आवाहन केले जात. मात्र, दुसरीकडे विभागाचे सहायक आयुक्त आणि अधिकारीच नगरसेवकांना जुमानत नसल्याने तसेच त्यांना कल्पना देत नसल्याने त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही संख्या वाढत असल्याचेही बोलले जात आहे.

के-पश्चिम विभागात आतापर्यंत २२३ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये विलेपार्ले नेहरुनगर, गिल्बर्ट हिल, आनंद नगर, जुनेद नगर, बेहरामबाग आदी परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नेहरु नगर आणि १ लाख लोकसंख्या असलेला गिल्बर्ट हिल यामध्येच सर्वाधिक रुग्ण आहे. मात्र, याशिवाय एक लाख लोकवस्ती असलेल्या बेहराम बाग तसेच आनंद नगर, शिवशक्ती नगर येथे जर लक्ष न दिल्यास येथील रुग्णांची भीती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे एका करोनाग्रस्तामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्कात किंवा त्यांच्या सान्निध्यात असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात असला तरी विभागांमध्ये कुणाला ताप, सर्दी आणि खोकला अशा प्रकारची लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती महापालिकेला देण्याचे आवाहन केले जात आहे. यासाठी महापालिका विभाग कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर केला जात आहे. या हेल्पलाईनवर विभागातील लोकांना अशा प्रकारच्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. विभागातील सर्व नगरसेवक आणि त्यांच्या संपर्कातील लोकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देऊन एकप्रकारे संशयित रुग्णांचा शोध घेण्यासही सुरुवात केली असल्याचे के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी मात्र, प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. क्वारंटाईन केलेल्या ठिकाणी विभागाच्या सहायक आयुक्तांचे लक्षच नाही. त्यांना वेळेवर जेवण दिले जात नाही. वारंवार खिचडीचा पुरवठा होतो आणि बहुतांशी वेळेवर ती खराबही झालेली असते. विशेष म्हणजे क्वारंटाईन कक्षात कोणत्याही लोकांना हलवले तर याची माहिती नगरसेवकांना दिली जात नाही. पण जेव्हा नगरसेवक म्हणून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तिथे गेल्यानंतर तेथील गैरसोयीबाबत अधिकाऱ्यांना फोन केला तरी ते उचलत नाही. बाधित क्षेत्रांमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे जर या विभागात कोरोनाची संख्या वाढत असेल तर त्याला प्रशासनाचा निष्काळजीपणाच जबाबदार असल्याचा आरोप पटेल यांनी केला. नगरसेवकांसोबत चर्चा करायला सहायक आयुक्तांना वेळ नाही. मात्र, आमदारांसोबत बैठक घेत चर्चा करतात. एवढेच काय तर सहायक आयुक्त नगरसेवकांचे फान उचलत नाही. असे असेल तर कोरोना नियंत्रणात कसा येईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -