घरमुंबईऑक्सिजन पुरवठ्यावर मुंबई महापालिकेची करडी नजर; नेमले सहा समन्वय अधिकारी

ऑक्सिजन पुरवठ्यावर मुंबई महापालिकेची करडी नजर; नेमले सहा समन्वय अधिकारी

Subscribe

मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी ४ विभागास एक याप्रमाणे हे समन्वय अधिकारी कामकाज सांभाळतील.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता राज्य शासन व मुंबई महापालिका गंभीर आजारी रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणि कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नशील असून ऑक्सिजन पुरवठयावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात समन्वय राखण्यासाठी महापालिकेच्यावतीने ६ समन्वय अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भांतील माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. मुंबईतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ऑनलाईन प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.

सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा – आदित्य ठाकरे

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईमध्ये आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासन व मुंबई महापालिकेकडून करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच २ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यात आली आहे. बेड्सची संख्यादेखील वाढवली जात आहे. त्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची सोय अधिकाधिक केली जात आहे. त्यामुळे सध्या होत असलेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखण्याबाबत सर्व यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय राखणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारे सहकार्य शासनाकडून करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढील १५ दिवस महत्वाचे – आयुक्त

मुंबई महापालिका क्षेत्रात महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशी एकूण १५० कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये सध्या २० हजार बेड्स आहेत. येत्या आठवड्यात या बेड्सची संख्या २२ हजार इतकी होणार आहेत. मागील १५ दिवसात मुंबईतील कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या ८ ते १० हजार दरम्यान स्थिरावली असली, तरी पुढील १५ दिवस आणखी महत्वाचे आहेत, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले.

६ समन्वय अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती

रुग्णांची वाढलेली संख्या आणि त्यांना लागणारा ऑक्सिजन पाहता पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत राखणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबईतील रुग्णालयांना सध्या २३५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत असून वाढती रुग्ण संख्या पाहता अधिकची मागणी शासनाकडे केली आहे, असे चहल म्हणाले. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात समन्वय राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने ६ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून तातडीने नियुक्ती करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांसाठी प्रत्येकी ४ विभागास एक याप्रमाणे हे समन्वय अधिकारी कामकाज सांभाळतील. तसेच प्रत्येकी ४ विभागास १ याप्रमाणे एकूण ६ ऑक्सिजन पुरवठादार नेमण्यात येतील. महापालिकेचे समन्वय अधिकारी हे अन्न व औषध प्रशासन, विभागांचे सहाय्यक आयुक्त आणि ऑक्सिजन पुरवठादार यांच्यात समन्वय साधून ऑक्सिजन पुरवठा योग्यरित्या व वेळीच उपलब्ध होत राहील, यासाठी दक्षता घेतील. खासकरुन ६४ नर्सिंग होममध्ये कोणतीही अडचण उद्भवणार नाही यासाठी ते समन्वय साधतील, असे चहल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -