घरमुंबईमाजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिका घेणार; एकमताने ठराव मंजूर

माजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिका घेणार; एकमताने ठराव मंजूर

Subscribe

मुंबई महानगर पालिकेच्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेने घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

मुंबईतील अनेक वार्धक्याकडे झुकलेल्या आणि एकाकी जीवन जगणार्‍या तसेच आरोग्यावरील खर्च न पेलवणार्‍या माजी नगरसेवकांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच, त्यांचे पालकत्व स्वीकारुन त्यांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा ठराव गुरुवारी महापालिका सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबतच्या ठरावाची सूचना मंजूर करत आयुक्तांकडे पुढील अभिप्रायासाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अनेक माजी नगरसेवकांना आर्थिक परिस्थितीमुळे हलाखीचे जीवन जगावे लागत असून उतरत्या वयात त्यांच्या आरोग्यावरील उपचाराचा खर्च त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही पेलवेनासा होतो.

ठरावाची सूचना मंजूर

अशा नगरसेवकांना वयोमानानुसार आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कुटुंबाकडून त्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याने अनेक माजी नगरसेवकांपैकी काही जण एकाकी जीवन जगत आहेत. विविध आजारांनी ग्रस्त असलेले तसेच वृद्धापकाळात एकाकी जीवन व्यतीत करणार्‍या माजी नगरसेवकांचे पालकत्व मुंबई महापालिकेने घेऊन त्यांच्यावरील वैद्यकीय उपचारांवरील तसेच पालनपोषणावरील खर्च करावा. जेणेकरून जीवनातील शेवटच्या काळात दु:खाच्या गर्तेत असलेल्यांना मायेची फुंकर मारता येईल, अशी मागणी काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. याबाबतच्या ठरावाची सूचना गुरुवारी महापालिका सभेत मंजूर करण्यात आली आहे.

- Advertisement -

माजी नगरसेवकांची देखभाल शक्य

माजी नगरसेविका इंदुमती माणगावकर यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. परंतु, मृत्यू होण्यापूर्वी त्या एकाकी जीवन जगत होत्या. कुटुंबाने त्यांची देखभाल न करता त्यांना वृद्धाश्रमात दाखल केले होते. तसेच असे अनेक माजी नगरसेवक आहेत, ज्यांना वृद्धापकाळातील आरोग्याच्या प्रश्नांवर वैद्यकीय उपचारांवर खर्च करणे अवघड होते. त्यामुळे महापालिकेने त्यांचे पालकत्व स्वीकारल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या अनेक माजी वयोवृद्ध झालेलया नगरसेवकांचा वैद्यकीय उपचारांवरील खर्च करता येईल, तसेच एकाकी जीवन जगणार्‍या माजी नगरसेवकांचीही देखभाल करता येईल, असे जामसूतकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ‘माजी नगरसेवकांचे पालकत्व महापालिकेने घ्यावे’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -