Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई अंध कामगाराला दिली  इलेक्ट्रिक पंपावर नोकरी

अंध कामगाराला दिली  इलेक्ट्रिक पंपावर नोकरी

Subscribe

मुंबई महापालिकेने 100 टक्के अंध असणार्‍या अनिल उत्तमराव शेलार या कामगाराला पाणीपुरवठा खात्यात धोका उद्भवू शकेल अशा इलेक्ट्रिक पंपाच्या ठिकाणी नोकरी दिली आहे. त्यामुळे शेलार हा सातत्याने भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहे.

मुंबई महापालिकेने 100 टक्के अंध असणार्‍या अनिल उत्तमराव शेलार या कामगाराला पाणीपुरवठा खात्यात धोका उद्भवू शकेल अशा इलेक्ट्रिक पंपाच्या ठिकाणी नोकरी दिली आहे. त्यामुळे शेलार हा सातत्याने भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहे. बी.ए. पदवीधर असलेल्या शेलारला पालिकेच्या शिपाई कर्मचारी क्रमांक – 1750942 पदावर नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या सहाय्यक अभियंता, पश्चिम उपनगरे, उत्तर बोरिवली येथील पालिकेच्या पाणीपुरवठा खात्यात लेबर म्हणून तो काम करतो.पंपिंग हाऊस येथील पाण्याचे व्हॉल्व हाताळणे आणि पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिकल पंप सुरू करण्याचे काम त्याला करावे लागत आहे. पण अनिल शेलार हा पूर्णपणे अंध असल्यामुळे त्या कामामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तो भीतीच्या छायेखाली जगत आहे.
 अनिल उत्तमराव शेलार याची मुंबई महापालिकेच्या अपंग अनुशेषातून 16 जुलै 2018 ला पालिकेत चतुर्थश्रेणी कामगार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी त्याला मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले होते. त्याच्या न्यायालयीन लढाईमुळेच 82 अंधांना नोकरी मिळाली होती. त्याच्या बरोबरच्या 81 जणांना पालिकेने योग्य प्रकारे विविध खात्यात नियुक्त केले. पण अनिल उत्तमराव शेलारला पाणीपुरवठा खात्यात पंपिंग हाऊसमध्ये पाण्याचे व्हॉल्व आणि पाणीपुरवठ्याचे इलेक्ट्रिकल पंप सुरू करण्याचे काम देण्यात आले आहे.
या कामात आपल्याला विजेचा शॉक लागू शकतो, अशी भीती त्याला वाटत राहते. बदलापूर ते बोरिवली असा दररोज खडतर प्रवास तो करतो. अनिलने आपल्या समस्येबद्दल मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांना विनंतीपत्र लिहिले आहे. आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यातून मार्ग काढावा, यासाठी त्याने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे आपली तक्रार मांडली आहे.
अनिल शेलार याच्या तक्रारीचा अर्ज सोमवारी मिळाला आहे. त्याच्या अपंगत्वाची मुंबई महापालिकेने दखल घेतली आहे आणि त्याला योग्य त्या ठिकाणी बदली द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे. 
-सुधीर नाईक, महापालिका उपायुक्त (सामान्य प्रशासन) 
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -