BMC budget 2021:बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव अन् लूकही बदलणार

प्रातिनिधीक फोटो

देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प आज बुधवारी सादर करण्यात आला. मुंबईसारख्या मोठ्या शहरात कोरोनाच्या महामारीच्या संकटानंतर सादर करण्यात आलेला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. यावेळी २०२०-२१ या वर्षासाठी २९४५.७८ कोटीचे शैक्षणिक अंदाजित अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान सादर होत असलेल्या BMC budget 2021 मध्ये करण्यात आलेल्या तरतूदीनूसार लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव अन् लूकही बदलण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील १३०० वर्ग खोल्या एलईडी इंटरअॅक्टिव्ह पॅनलद्वारे डिजिटल क्लास रूममार्फत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात यासाठी विशेष तरतूद BMC budget 2021-22 या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. याकरता डिजिटल क्लासरूमची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर यामध्ये प्रथमिकसाठी २३.५८ कोटी तर माध्यमिकसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तर सद्यस्थितीत मराठी, हिंदी, ऊर्दू आणि इंग्रजी या ४ माध्यमाच्या एकूण ४८० शाळांमध्ये ३६० प्राथमिक १२० माध्यमिक शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डिजिटल पद्धतीच्या शिक्षणासाठी प्राथमिक शाळांसाठी ८.०५ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद तर माध्यमिकसाठी ५.१० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या स्वतःच्या मालिकेच्या एकूण ४६७ शालेय इमारती आहेत. यापैकी बऱ्याच शालेय इमारतींची कामं प्रगतीपथावर आहेत. मुंबईतील नागरिकांच्या मनात महानगर पालिका शाळांच्या रंगाविषयी एक विशिष्ट ओळख प्राप्त व्हावी, याकरता शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत दुरूस्तीसह दर्जा सुधारण्यासाठी शाळांची रंगरंगोटीची कामे सुरू आहे. शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी पायाभूत भौतिक सेवा सुविधेत प्राथमिक अर्थसंकल्पीय तरतूदही १९०. ०१ कोटी रूपये करण्यात आली आहे.

दरम्यान महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी पालिकेच्या शाळांचे नाव देखील बदलण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे ‘मुंबई पब्लिक स्कुल’ असे पुन: नामानिधन करून नवीन लोगोसह देखील संबोधले जाणार आहे. यामध्ये प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल (M.P.S.) असं संबोधण्यात येणार आहे. MPS करता नव्या लोगोची निर्मितीही करण्यात येणार आहे.