BMC Budget 2023-24 : 2 फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; मुंबईकरांना काय मिळणार?

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ‘मुंबई’ला ओळखलं जातं. यात मुंबईची महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून अनेकांना मोठी आशा असते. याच मुंबई महापालिकेचा 2023- 2024 या वर्षाचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. यंदा मुंबई महापालिका प्रशासक हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. महापालिकेच्या या अर्थसंकल्पातून नागरिकांसाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण अशा गोष्टींवर भर दिला जातो. यामुळे मुंबईकरांच्या या अर्थसंकल्पातून कोणत्या अपेक्षा पूर्ण होणार? मुंबईकरांसाठी यातून काही नव्या घोषणा केल्या जाणार का? याकडे सर्वांच लक्ष आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 2023- 2024 चा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल मांडणार आहेत आणि तेच मंजुरी देणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन मोक्यावर सादर होणार असल्याने त्यात आरोग्य, शिक्षण, रस्ते यावर भरीव तरतूदीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रत्यक्ष मुंबईकरांच्या पदरी काय पडणार हे देखील या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे. यात आर्थिक सक्षमीकरणासाठी पालिका कोणत्या उपाययोजनांवर भर देणार याकडेही सर्वांच लक्ष लागून आहे.

गेल्या वर्षीच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्या सेवांवर 1800 कोटींची वाढ करत एकूण 6624.41 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही ही वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या 45949.21 कोटींच्या अर्थसंकल्पात यंदा सुमारे साडेचार हजार कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे. या आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत कोणत्या मोठ्या प्रकल्पांच घोषणा होते याकडे सर्व लक्ष ठेवून आहेत.

सध्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार नगरसेवक आणि प्रशासनाच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. तब्बल 38 वर्षांनंतर मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातून चालवला जात आहे. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या तारखेपर्यंत लागू राहील. 7 मार्चनंतर मुंबईचा संपूर्ण कारभार पालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे.


Budget 2023 : 1 फेब्रुवारी पासून बदलणार ‘हे’ नियम, यासाठी मोजावे लागणार ज्यादा पैसे