घरमुंबईमुंबईकरांचे सहकार्य मिळाले, तरच कोरोनावर नियंत्रण शक्य - इकबाल सिंह चहल

मुंबईकरांचे सहकार्य मिळाले, तरच कोरोनावर नियंत्रण शक्य – इकबाल सिंह चहल

Subscribe

मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येत तिपटीने झालेल्या वाढीबाबत पालिका आयुक्तांनी यांनी गंभीर दखल घेतली.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. येत्या दोन-तीन दिवसांत कोरोनावर अपेक्षित नियंत्रण न आल्यास लॉकडाऊनबाबत अथवा कडक निर्बंधांबाबत निर्णय घेण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना दिला आहे. याच अनुषंगाने मुंबईतील कोरोनाच्या रुग्ण संख्येत तिपटीने झालेल्या वाढीबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबईकरांचे पूर्वीप्रमाणे सक्रिय सहकार्य मिळाले, तरच या संकटावर पुन्हा नियंत्रण आणणे शक्य आहे, असे स्पष्ट मत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केले. तसेच, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईकरांना अधिकाधिक स्वयंशिस्तीची गरज आहे. मुंबईकर यात कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लसीकरणानंतर लगेच दिलासा मिळेल असे नाही

मुंबईकर गेले वर्षभर कोरोना विरोधाची लढाई लढत आहेत. दोन महिन्यापासून आपल्या मदतीला लसही आलेली आहे. परंतु, लसीकरणानंतर लगेच दिलासा मिळेलच असे नाही. लसीकरणानंतरही कोरोनासोबत पुन्हा नव्याने जगायला शिकण्‍याची गरज निर्माण झाली आहे. कारण, आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन व्यवहारात कोरोना प्रतिबंधाबाबत शिथिलता आलेली दिसते. मुंबईत त्याचे दुर्दैवी परिणाम दिसायला लागले आहेत. रुग्णसंख्या पूर्वीपेक्षा तिप्पट होत आहे. शासनाच्या मदतीने महापालिका या संकटाला सामोरे जाण्यासाठी पुन्हा सज्ज झालेली आहे.

- Advertisement -

४१.७४ लाख नागरिकांची कोरोना चाचणी

महापालिकेने मागील वर्षभरात ४१ लाख ७४ हजार २५९ नागरिकांची कोरोना चाचणी केलेली आहे. ५३ लाख ५२ हजार ५२१ लोकांचे विलगीकरण केलेले आहे. दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आतापर्यंत १२ लाख ६० हजार ३८७ नागरिकांचे लसीकरण केले आहे. तर दोन वेळा ३५ लाख मुंबईकर नागरिकांच्या कुटुंबाच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे, असा दावा आयुक्तांनी केला आहे.

वैयक्तिक, कार्यालयीन स्तरावर उपाययोजनांची गरज

कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि हमखास असा तोडगा सापडून कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत आपल्या सर्वांमध्ये आलेली जीवनशैलीमधील शिथिलता आता बदलून नव्याने काही बदल करणे सर्वांनाच आवश्‍यक झाले आहे. तोंडावर मास्‍कचा नियमित वापर, सुरक्षित शारीरिक अंतर, वारंवार साबणाने हात धुणे आणि निर्जंतुकीकरणाचा वापर याच्‍यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्‍यात नवीन बदलांचा अवलंब करणे अत्यंत आवश्‍यक झाले आहे. अशा बदलांचा स्‍वीकार करुन, या माध्‍यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबईसह राज्यभरात कृती आराखड्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisement -

जगात या संसर्गजन्य आजारावर तात्काळ तोडगा असणारे औषध अद्यापही आलेले नाही. कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी आता नव्या जोमाने स्वतःहून काही गोष्टी अंगीकारणे गरजेचे असल्याचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -