Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई मुंबईची तुंबई झाल्यानंतर सर्व 'मॅनहोल'ची झाडाझडती घेण्याचे आदेश

मुंबईची तुंबई झाल्यानंतर सर्व ‘मॅनहोल’ची झाडाझडती घेण्याचे आदेश

Related Story

- Advertisement -

मुंबईला मुसळधार पावसामुळे अवघ्या १२ तासात ‘मुंबईची तुंबई’ होऊन नागरिकांचे हाल झाल्यानंतर आता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, शहर व उपनगरातील सर्वत्रच्या ‘मॅनहोल’ची पुन्हा एकदा झाडाझडती घेण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. बुधवारी पहाटे ५ पासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक २१४.४४ मिमी, पश्चिम उपनगरात १९०.७८ मिमी आणि शहर भागात १३७.८२ मिमी इतका पाऊस पडला. पालिकेने १०४ टक्के नालेसफाई केली असल्याचा दावा पालिका व महापौर किशोरी पेडणेकर यांनी, पावसापूर्वी केला होता. मात्र सर्व दावे फोल ठरले.

कालच्या मुसळधार पावसामुळे मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक विस्कळीत होऊन हजारो प्रवाशांचे हाल झाले. मात्र पालिकेने सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी छोटे पंप तर मोठ्या प्रमाणात पाणी साचणार्या ठिकाणी सहा मोठे पंपिंग स्टेशन कार्यान्वित करूनही पालिकेला पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यात अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे आता मुंबईची तुंबई होण्यास पाण्याचा निचरा करणारे ‘ मॅनहोल’ कारणीभूत आहेत का, त्यांची सफाई नीटपणे झाली होती का, इतर काही कारणे आहेत का, याबाबतच्या कारणांचा शोध घेण्याची तयारी  पालिका यंत्रणेने सुरू केल्याचे समजते.

- Advertisement -

त्यातच, भांडूप (पश्चिम) येथील व्हिलेज रस्त्यावर पूर्वेला असलेल्या एका मॅनहोलचे झाकण कालच्या जोरदार पावसाप्रसंगी निघाल्याची आणि त्‍यामुळे दोन महिला त्‍यात पडताना वाचल्‍याची चित्रफित समाजमाध्‍यमांमध्‍ये तसेच वृत्‍तवाहिन्‍यांवर प्रसारित झाली होती. पालिकेने त्याची गंभीर दखल घेऊन सदर मॅनहोल तातडीने हटवून तेथे नवीन मॅनहोल लावण्‍याचे काम युद्धपातळीवर केले आहे.

पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते, असा पालिकेचा दावा आहे. मात्र कालच्या जोरदार पावसानंतर महापालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आवश्‍यक तेथील मॅनहोल बदलण्‍याची कार्यवाही करण्‍यात येत आहे. तसे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

- Advertisement -

मुंबईत ७३ हजार मॅनहोल

पावसाच्या पाण्याचा निचरा मॅनहोलच्या मार्फत करण्यात येतो. मुंबई शहरातील ८५५, पश्चिम उपनगरातील ३५५ आणि पूर्व उपनगरातील १८६ मॅनहोलवर सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. मुंबईत एकूण ७३ हजारांवर मॅनहोल आहेत.

मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्याने समस्या ऐरणीवर

ऑगस्ट २०१७ मध्ये मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एल्फिन्स्टन येथे रस्त्यावरील उघड्या’मॅनहोल’मध्ये पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळेच धोकादायक मॅनहोलची समस्या ही ऐरणीवर आली होती.

- Advertisement -