घरमुंबईऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ‘मिशन मोड’वर कार्यवाही करा; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश 

ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ‘मिशन मोड’वर कार्यवाही करा; मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश 

Subscribe

इकबाल सिंह चहल यांनी ऑक्सिजन निर्माते व पुरवठादारांशी चर्चा करून मुंबईला दररोज आवश्यक असलेल्या २३५ मे. टन ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ‘मिशन मोड’वर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतील काही रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आल्याने कोरोनाबाधित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात तात्काळ स्थलांतरित करावे लागले होते. त्यामुळे पालिका प्रशासन हादरले. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ऑक्सिजन निर्माते व पुरवठादारांशी चर्चा करून मुंबईला दररोज आवश्यक असलेल्या २३५ मे. टन ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यासाठी ‘मिशन मोड’वर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जामनगर (गुजरात), विशाखापट्टणम, रायगड येथून दररोजच्या ऑक्सिजन पुरवठ्यासोबतच ५०० टन अधिक ऑक्सिजनचा साठाही लवकरच मिळणार आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालयात रुग्णांना भेडसावणारी ऑक्सिजनची कमतरता निकाली निघणार आहे.

तसेच ऑक्सिजनच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. ऑक्सिजनअभावी कोणताही अनुचित प्रसंग ओढवू नये यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेशही आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे, तर दुसरीकडे पालिकेच्या सहा रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा संपल्याने १६८ कोरोनाबाधित रुग्णांनातात्काळ नजीकच्या रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले.

- Advertisement -

या गंभीर घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. सरकार व पालिका प्रशासन चांगलेच हादरले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ऑक्सिजन निर्माता व पुरवठादार यांच्याशी तात्काळ चर्चा करून मुंबईत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. मुंबई महापालिका हद्दीतील महापालिका व सर्व खासगी रुग्णालयांमध्ये दररोज ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी महापालिका यंत्रणा युद्ध पातळीवर कामकाज करीत असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मुंबईत ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भात प्रणालीमध्ये अधिक सुसूत्रतता व समन्वय साधण्यासाठी महापालिका आयुक्त चहल यांनी सोमवारी ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्वसंबंधितांची आढावा बैठक घेतली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलरासू, सुरेश काकाणी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध सहआयुक्त, उपआयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाचे इतर अधिकारी, विविध प्राणवायू उत्पादक तसेच पुरवठादार या बैठकीत सहभागी झाले होते.

- Advertisement -

पालिकेच्या ६ रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने संबंधित रूग्णालयांतील रुग्ण स्थलांतरीत केल्याबद्दल आयुक्त्यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले. इतक्या मोठ्या संख्येने रुग्णांची ने-आण करताना महापालिकेच्या यंत्रणेने जो समन्वय राखला, तो अभूतपूर्व पद्धतीचा होता आणि ही सर्व कार्यवाही एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हती, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -