घरमुंबईमहापालिका शाळांमध्ये अबॅकस उपक्रम हवाच!

महापालिका शाळांमध्ये अबॅकस उपक्रम हवाच!

Subscribe

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी सर्व शाळांमध्ये अबॅकस या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची नगरसेवकांची मागणी फेटाल्याने शिक्षण समितीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अबॅकस या उपक्रमाची शालेय मुलांना आवश्यकता असून हा उपक्रम राबवण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करत हा प्रस्ताव पुन्हा प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अबॅकस हा उपक्रम राबवण्याची मागणी शिवसेना नामनिर्देशित नगरसेवक अरविंद भोसले यांनी ठरावाच्या सूचनेद्वार केली होती.

प्राथमिक शिक्षण देणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. त्याला अनुसरून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून शिक्षण देताना नवनवीन उपक्रम राबवत असते. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची बौध्दिक क्षमता वाढवण्यासाठी अशा तंत्राचा वापर करणे हितावह ठरेल,असे त्यांचे म्हणणे होते. अबॅकस हा विषय महापालिका शाळेतील मुलांसाठी उपयुक्त होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट करत नगरसेवकांची ही मागणी शिक्षण विभागाने फेटाळली होती.

- Advertisement -

अबॅकसबाबत बालमोहन विद्यामंदिर, सरस्वती विद्यामंदिर, मराठा विद्यामंदिर, बाबासाहेब गावंडे हायस्कूल या शाळांना भेट देण्यात आली. तसेच माजी शिक्षण समिती अध्यक्षांसह बालमोहन शाळेलाही भेट देण्यात आली. त्या पाहणीमध्ये अबॅकस हा विषय महापालिका शाळेतील मुलांसाठी उपयुक्त होणार नसल्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आल्याचे महापालिका शिक्षणाधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते. याबाबतचा प्रस्ताव समितीच्या पटलावर आला असता माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर या उपक्रमाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर भाजपचे नगरसेवक पंकज यादव यांनी हा उपक्रम जर राबवणे शक्य नाही, असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर त्याची कारणेही स्पष्ट व्हायला पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नक्की काय उणीव आहे, हे तरी समोर येईल, असे सांगितले. त्यानुसार हा प्रस्ताव शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -