घरमुंबई‘वाडिया’ ला तात्पुरते १३ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय

‘वाडिया’ ला तात्पुरते १३ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय

Subscribe

वाडिया रुग्णालय बंद करण्याचे संकट टळले.

आर्थिक मदतीअभावी परळमधील वाडिया रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याने महापालिकेकडे असलेल्या १२६ कोटी रुपयांच्या थकीत रकमेच्या तुलनेत तीन महिन्यांसाठी आर्थिक मदत करण्याची मागणी स्थायी समितीने केली. त्यानंतर गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या दालनात आयुक्तांसोबत बैठक घेत तात्पुरत्या स्वरुपात १३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही रक्कम देण्यासाठी प्रशासनाने तयारी दर्शवली असून लवकरच ही रक्कम वाडिया रुग्णालयात देण्यात येणार असल्याने हे रुग्णालय बंद करण्याचे संकट टळले आहे.

निधी तातडीने देण्याचा निर्णय

वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक घेतली. या बैठकीमध्ये १३ कोटी रुपयांचा निधी वाडिया रुग्णालयाला तातडीने देण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, माजी महापौर तथा नगरसेविका श्रध्दा जाधव, नगरसेवक सचिन पडवळ आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नक्की वाचाअश्विनी जोशी राजकीय सुडाच्या बळी?

विरोधी पक्षनेत्यांना बैठकीची दिली नाही कल्पना

मुंबई महापालिका वाडिया रुग्णालयाला ५० टक्के आर्थिक निधी देत असते. गेल्या काही दिवसांपासून हा निधी महापालिकेकडून प्राप्त होत नसल्याने रुग्णसेवा तसेच कर्मचाऱ्यांचा पगार खोळंबण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मागील स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत हरकतीच्या मुद्द्याद्वारे या हे रुग्णालय बंद करण्याचा घाट प्रशासन घालत असल्याचा आरोप केला होता. परंतु महापौरांनी याबाबतची बैठक घेताना विरोधी पक्षनेत्यांनाही याची कल्पना दिली नाही.

- Advertisement -

अखेर दोन्ही जाधवांना बोलवावे लागले

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही दिवसांपूर्वी वाडिया रुग्णालयाला भेट देऊन वाडिया रुग्णालय प्रशासनासोबत बैठक घेऊन सध्यस्थिती जाणून घेतली होती. यामध्ये गरीब रुग्णांचे कुठल्याही प्रकारे हाल होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन आणि वाडिया रुग्णालय प्रशासनाने एकत्र बसून मार्ग काढावा, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली. मात्र, महापौरांनी या रुग्णालयाला भेट देताना व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेल्या माजी महापौर व स्थानिक नगरसेविका श्रध्दा जाधव आणि भाजप नगरसेविका राजेश्री शिरवाडकर यांना कोणतीही कल्पना दिली नव्हती. या दोन्ही नगरसेवकांना कल्पना न देणार्‍या महापौरांनी, एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, सचिन पडवळ आणि सिंधुताई मसुरकर या नगरसेवकांना सोबत घेऊन बैठक घेतली होती. त्यामुळे आधी यशवंत जाधव यांना डावलणार्‍या महापौरांनी आता महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर अखेर या बैठकीला यशवंत जाधव आणि श्रध्दा जाधव या दोघांनाही त्यांनी बोलावून घेतल्याचे समजते.


हेही वाचा – ग्रीट पावडरमुळे झाला ‘तो’ अपघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -