गरीब, गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाईमशीन घरघंटीचे वाटप, महापालिकेचा मोठा निर्णय

BMC Distribution of sewing machine for self-employment to poor and needy women

मुंबई महापालिका जेंडर बजेट अंतर्गत दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच मुंबईतील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, ४० वर्षावरील अविवाहित महिला, गिरणी कामगार, देवदासी महिला व गरीब, गरजू महिला कोविडमुळे पतीच्या निधनामुळे विधवा झालेल्या महिला यांना स्वयंरोजगारासाठी तब्बल ६ कोटी २२ लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.

या सर्व महिलांना पालिकेतर्फे शिलाई मशीन, वाती बनविण्याचे यंत्र आणि घरघंटी रोजगारासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सर्व महिलांना स्वयंरोजगाराचे साधन घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यांना स्वतःचा व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे शक्य होणार आहे. कामधंद्यासाठी कोणाकडे लाचारी पत्करावी लागणार नाही. एकप्रकारे या सर्व गरीब, गरजू महिलांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना समाजात ताठ मानेने जगता येणार आहे.

शिलाई मशीनसह सर्व साहित्यांचे असे होणार वाटप

प्रत्येक वार्डातील पात्र १३ महिला याप्रमाणे २२७ वार्डात एकूण २ हजार ९५१ पात्र महिलांना पालिकेतर्फे प्रत्येकी एक याप्रमाणे घरघंटी ( किंमत २० हजार ६१ रुपये), शिलाई मशीन ( किंमत १२ हजार २२१ रुपये) आणि वाती बनविण्याची मशीन ( किंमत ३३ हजार २३० रुपये) देण्यात येणार आहे. प्रत्येक वार्डात ४ घरघंटया ( एकूण किंमत ८० हजार २४४ रुपये), ४ वाती बनविण्याचे यंत्र ( एकूण किंमत १ लाख ३२ हजार ९२० रुपये), आणि ५ शिलाई मशीन याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे एका वार्डात १३ वस्तूंसाठी २ लाख ७४ हजार २६९ रुपये खर्चण्यात येणार आहेत.

पालिकेला २२७ वार्डात प्रत्येकी ५ शिलाई मशीन याप्रमाणे १ हजार १३५ शिलाई मशीन खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी १ कोटी ३८ लाख ७० हजार ८३५ रुपये एवढा खर्च येणार आहे. तसेच, २२७ वार्डात प्रत्येकी ४ वाती बनविण्याचे यंत्रे याप्रमाणे ९०८ यंत्रे खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी ३ कोटी १ लाख ७२ हजार ८४० रुपये खर्च येणार आहे. त्याचप्रमाणें, २२७ वार्डात प्रत्येकी ४ घरघंटया याप्रमाणे ९०८ खरेदी करून त्यांचे वाटप करण्यासाठी १ कोटी ८२ लाख १५ हजार ३८८ रुपये खर्च येणार आहे.

पालिकेला एकूण ९५% खर्च करावयाचा असून त्यासाठी ५ कोटी ९१ लाख ४५ हजार ७५८ रुपये एवढा निधी खर्च करायचा आहे. तर पात्र गरीब, गरजू महिलांना एकूण ५% खर्च करावयाचा असून त्यासाठी या महिलांना ३१ लाख १३ हजार ३०५ रुपये खर्च येणार आहे. एकूण २२७ वार्डात प्रत्येकी १३ वस्तूंसाठी पालिकेला तब्बल ६ कोटी २२ लाख ५९ हजार ६३ रुपये खर्च येणार आहे.

पात्रतेसाठी निकष

पिवळी / केशरी शिधापत्रिका व वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. वयोमर्यादा १८ ते ६० एवढी असेल. विधवा महिलांनी पतीच्या मृत्यूबाबतचे प्रमाणपत्र,प्रतिज्ञापत्र सादर करणे. मुंबईतील १५ वर्षे वास्तव्याचा दाखला देणे.आधारकार्ड, पॅनकार्ड, घटस्फोटित महिलेने दाव्याचे कागदपत्रे देणे. गिरणी कामगार महिलेने त्याचे पुरावे देणे.


हेही वाचा : विनोद तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती, तावडे पुन्हा मुख्य प्रवाहात