घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

मुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप

Subscribe

डिग्रीधारक अभियंत्यांवर झालेला अन्याय महापौर किशोरी पेडणेकर यांनी दूर करावा. तसेच या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेतील १३२ अभियंत्यांना बढती देण्याबाबतचा प्रस्ताव कोणत्याही प्रकारची चर्चा न करता झटपट मंजूर करण्यात आला. एवढेच नव्हे तर डिग्री असलेल्या १०२ अभियंत्यांना डावलून, त्यांच्यावर अन्याय करून १३२ अभियंत्यांना बढती देण्याचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यामागे मोठा गैरव्यवहार झाला आहे, असा गंभीर आरोप पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. हाच प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून सोमवारी पालिका सभेत मंजुरीसाठी येणार आहे. त्यावेळी आम्ही हा मुद्दा मांडणार आहोत. डिग्रीधारक अभियंत्यांवर झालेला अन्याय महापौर किशोरी पेडणेकर यांनी दूर करावा. तसेच या प्रस्तावाचा फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणार असल्याचे रवी राजा यांनी सांगितले.

गुरुवारी स्थापत्य समितीच्या (शहर) बैठकीत समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे यांनी चर्चा न करता झटपट मंजूर केला. सध्या पालिकेतील सर्व समित्यांच्या सभा ऑनलाईन घेण्यात येत आहेत. कोणत्याही समितीचा अजेंडा बैठकीच्या तीन दिवस आधीच अभ्यास करण्यासाठी सदस्यांना देण्याची कार्यपद्धती आहे. मात्र, या समितीचा अजेंडा उशिराने देण्यात आला होता. तो बकरी ईदच्या दिवशी २१ जुलैला घरी पाठवण्यात आला.

- Advertisement -

दुसऱ्याच दिवशी १३२ अभियंत्यांच्या बढतीचा प्रस्ताव सभेत लगेचच मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे या समितीवरील आमच्या काँग्रेस पक्षाचे सदस्य सुफियान वणू यांना ऑनलाईन सभेची लिंक ११.५५ वाजता पाठविण्यात आली. त्यामुळे सभेत जेव्हा ते उपस्थित राहिले, तेव्हा सभेत हरकतीच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. अभियंत्यांच्या बढतीचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे वणू यांना सांगण्यात आले, असेही रवी राजा यांनी सांगितले.

कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही – दत्ता पोंगडे

अभियंत्यांच्या बढतीबाबतच्या प्रस्तावाला न्यायालयात आव्हान देऊन त्यात कोणी अडथळा निर्माण करू नये, यास्तवच सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही, असे सांगत स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे यांनी विरोधी पक्षातर्फे करण्यात आलेला आरोप फेटाळून लावला. तसेच काँग्रेसचे सदस्य सुफीयान वणू हे सभा सुरू असताना उपस्थित होते. हरकतीच्या मुद्ध्यावरील चर्चेत त्यांनी भागही घेतला. मात्र, तेव्हा ते या बढतीच्या प्रस्तावावर काही बोलले नाहीत. त्यांनी या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला असता आणि प्रस्ताव मंजूर न करण्याची मागणी केली असती, तर मी तो प्रस्ताव राखून ठेवला असता, असे दत्ता पोंगडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -