घरमुंबई‘पढेगा इंडिया...’ मोहिमेला पालिकेकडून हरताळ

‘पढेगा इंडिया…’ मोहिमेला पालिकेकडून हरताळ

Subscribe

‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ या घोषवाक्यातून देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील करत आहे. परंतु मुंबईतील विविध भागातील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये स्थलांतरित करणार्‍या मुंबई महापालिकेने केंद्राच्या या योजनेलाच हरताळ फासल्याचे दिसून येते.

‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ या घोषवाक्यातून देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील करत आहे. परंतु मुंबईतील विविध भागातील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये स्थलांतरित करणार्‍या मुंबई महापालिकेने केंद्राच्या या योजनेलाच हरताळ फासल्याचे दिसून येते. परिसरात महापालिकेची शाळा नसल्याने व खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे मुलांना पूर्वीच्याच जुन्याच शाळेत जावे लागत आहे, तर परिसरात असलेल्या बीपीसीएल, एचपीसीएल या रिफायनरी कंपन्या व आरसीएफ फर्टिलायझर कंपनीमुळे हवेत सोडण्यात येणार्‍या घातक रासायनिक घटकांमुळे अनेक मुलांना त्वचारोग, श्वसन व घशाच्या आजार सतत होत असल्याने त्यांनी शाळेत जाणे बंद केल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

कोणत्याही सुविधा पालिकेकडून उभारण्यात आलेल्या नाहीत.

मुंबईत राबवलेल्या विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे पालिकेकडून स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या या नागरिकांसाठी माहुलमध्ये तब्बल 72 इमारती बांधल्या असून, त्यातील 50 पेक्षा अधिक इमारतींमध्ये रहिवाशी राहण्यासाठी आले आहेत. अंधेरी, साकीनाका, कांजूरमार्ग, मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी, गोरेगाव, राम मंदिर रोड येथील विविध प्रकल्पातील नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या या नागरिकांसाठी येथे शाळा, दवाखाना अशा कोणत्याही सुविधा पालिकेकडून उभारण्यात आलेल्या नाहीत. परिसरात पालिकेची कोणतीही शाळा नसल्याने येथील नागरिकांना आपल्या मुलांना खासगी शाळेत प्रवेश घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. परंतु त्याही शाळेची क्षमता मर्यादित असल्याने बहुतांश मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ते पूर्वी राहत असलेल्या ठिकाणच्याच शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागत आहे. परंतु आपली जुनी शाळा ही घरापासून फार लांब असल्याने बस, ट्रेन व पुन्हा बस असा प्रवास करून त्यांना शाळा गाठावी लागते.

- Advertisement -

दूषित हवा व पाण्यामुळे आजार

यासाठी अनेक मुलांना तब्बल दोन तास ये-जा करण्यासाठी लागतात. माहुल येथील रासायनिक कंपन्या व फर्टिलायझर कंपनीमुळे हवेतील रासायनिक घटकांमुळे येथील नागरिकांना त्वचरोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याचा परिणाम मुलांच्या शाळांवर ही होत आहे. अनेक मुलांना त्वचेचे आजार होत असल्याने ते शाळेत जाणे टाळत आहेत. शाळेला वारंवार दांडी मारावी लागत असल्याने अनेक मुलांनी शाळा सोडल्या आहेत. माहुलमधील इमारत क्रमांक 38 मध्ये राहणारे खलील जब्बार शेख कुर्ला येथील ठक्कर बाबा पाईपलाईन येथून 15 महिन्यांपूर्वी राहण्यास आले. शेख हे रिक्षाचालक असून, त्यांच्या घरात नऊ सदस्य आहेत. येथे राहण्यास आल्यापासून येथील दूषित हवा व पाण्यामुळे घरातील सतत कोणीतरी आजारी असते. त्यांची मुलगी सना शेख (वय 12) व मुलगा शब्बीर शेख (वय 19) यांना सतत होत असलेल्या त्वचारोगामुळे त्यांनी शाळेत जाणे बंद केले.

जगायचे कसे 

कारण त्वचेवर उठणार्‍या चट्ट्यांमुळे त्यांना शाळेत बसणे अवघडून जात असे. तसेच दुसरा मुलगा साहिल शेख (वय 16) याने शाळेत येणे-जाणे लांब पडत असल्याने नववीला शाळा सोडल्याचे खलील शेख यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व व्यक्ती सतत आजारी असल्याने खलील शेख यांना घरातील सर्व व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेण्यातच वेळ जातो. त्यामुळे दररोज होणार्‍या दोन हजारांच्या कमाईवर पाणी सोडावे लागत आहे. एकीकडे कमाई होत नसताना दुसरीकडे उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने कसे जगायचे असा प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा खलील शेख यांनी व्यक्त केली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -