घरCORONA UPDATEमहापालिकेच्या कचरा गाडीच्या चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर?

महापालिकेच्या कचरा गाडीच्या चालकाचा कोरोनामुळे मृत्यू; कंत्राटी कर्मचारी वाऱ्यावर?

Subscribe

कोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या आतापर्यंत सहा कामगार, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असून आता कचऱ्याच्या गाडीवरील कंत्राटी वाहन चालकाचाही चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. कोविडच्या या युध्दात महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारही तेवढ्याच तत्परतेने काम करत असल्याने शहरांमध्ये स्वच्छता राखली जात आहे. परंतु महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना केंद्र सरकारच्या सर्व मार्गदर्शक सुचनांनुसार कोविडसंदर्भातील मदत दिली जात असेल तर मग ‘कोरोना’मुळे महापालिकेचेच काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना हा न्याय का नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या उपाययोजना राबवताना महापालिकेच्या करनिर्धारण संकलन, घनकचरा व्यवस्थापन, शताब्दी रुग्णालय, वीजतंत्री आदी विभागातील सहा कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत मृत्यू झाले. त्यानंतर एच-पश्चिम येथील कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाच्या चालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराने आपण निश्चित केल्याप्रमाणे त्यांना कोविड १९मध्ये काम करताना चालक आणि क्लिनर यांना पीपीई किट तसेच मास्क सह सॅनिटायर्झस उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले. परंतु हा कंत्राटी कामगार कोरोनातही महापालिकेच्या कामगारांप्रमाणेच काम करत असून जर महापालिका आपल्या कामगारांना कोविड संदर्भात केंद्राच्या ज्या काही शिफारशी आहेत, त्यानुसार मदत देत असेल तसेच दैनंदिन जोखीम भत्ता ३०० रुपये देत असेल तर ते या कंत्राटी कामगारांना का नाही असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी केला आहे.

- Advertisement -

त्यामुळे महापालिकेने या कंत्राटी कामगारांची दखल घेवून त्याप्रमाणे त्यांच्या कामाची कदर न केल्यास यापुढे कामगारांना काम बंद आंदोलन पुकारण्याशिवाय पर्याय नाही,असा इशारा त्यांनी दिला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करताना या कंत्राटी सफाई कामगारांच्या मुद्दयावरही त्यांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही हालचाल नाही, असेही त्यांनी नमुद केले.

महापालिकेने कचरा वाहून नेण्यासाठी व विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार कंत्राटदारांनी वाहन चालक व क्लिनरसह वाहने पुरवली. या कंत्राटी कामगार चालकांसह क्लिनरच्या आरेाग्याची काळजी कंत्राटदार घेत नसल्याने, त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कामगारांना पीपीई किट व मास्क देण्यास सुरुवात केली. तसेच जेवणही देण्यास सुरुवात केले. जर हे कामगार महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणे काम करत आहेत,तर मग त्यांना कोविड १९च्या नियमांनुसार मदत का नाही,असा सवाल या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी केला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना तातडीने अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्याचे मुंबई महापालिकेने मान्य केले आहे.

- Advertisement -

परंतु कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांना याचा लाभ का मिळत नाही असा सवाल त्यांनी केला. महापालिकेच्या सफाई कामगारांप्रमाणेच हे कंत्राटी कामगार जीव धोक्यात घालून काम करत असल्याने मृत कामगाराच्या नातेवाईकांना केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आर्थिक मदत देण्याची मागणी केतन नाईक यांनी केली. तसेच महापालिकेने या कंत्राटी कामगारांना ३०० रुपये जोखीम भत्ता द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -