मुंबईतील जम्बो कोव्हिड सेंटर बनणार आता लसीकरण केंद्र

१०० कोरोना लसीकरण केंद्र उभारणार

jumbo covid center in mumbai to be implemented as jumbo vaccination center
मुंबईतील जंबो कोविड सेंटर बनणार आता लसीकरण केंद्र

राज्यात कोरोना लसीकरणच्या अभियानासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी सुरु आहे. त्यातच राज्य सरकारने परवानगी देताच मुंबई लस उपलब्ध झाल्यानंतर विविध शहर व उपनगरांतील कोरोना लसीकरण केंद्रात लसीकरण अभियानास सुरुवात होणार आहे. लसीकरण अभियान जलद होण्यासाठी म्हणजे दिवसाला ५० हजार जणांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत आठ लसीकरण केंद्रे पुरेशी ठरणार नसल्याने प्रत्येक वार्डात किमान ५ लसीकरण केंद्र याप्रमाणे १०० लसीकरण केंद्रे उभारण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात सव्वालाख कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर तिसऱ्या टप्पायात ज्येष्ठ नागरिक, सामान्य नागरिक आणि लहान मुलांना लस देण्यात येणार आहे.

मुंबईत लसीकरण केंद्रांची कमतरता भासू नये यासाठी आता पालिकेने आपत्कालीन उपाययोजना म्हणून मुंबईत बीकेसी, नेस्ले, रिचर्डसन क्रुड्स आदी ज्या ज्या ठिकाणी जंबो कोरोना सेंटर उभारले आहे तेथील रिक्त जागेत एका बाजूला कोरोनावरील लस देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या जंबो कोरोना सेंटरच्या ठिकाणी कोरोना बाधितांवर उपचार होतील आणि दुसरीकडे लसीकरणसुद्धा करण्यात येणार आहे. मात्र यावेळी कोरोना पॉझिटिव्ह व लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये संपर्क होऊ नये, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.


हेही वाचा – अल्पवयीन मुलांनाही लस देणार; प्रतिदिन १२ हजार लसीकरणाचे लक्ष्य