घरमुंबईएका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी महापालिका सज्ज

एका दिवसात १० हजार रुग्ण वाढले तरी महापालिका सज्ज

Subscribe

मुंबईत एका दिवसात १० हजार कोरोना रुग्ण वाढले तरी महापालिका सज्ज आहे. मुंबईकरांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. फक्त कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे, असे आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चहल म्हणाले की, मुंबईत आतापर्यंत १० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. दिवसाला १ लाख लोकांना लस देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच मुंबईत येत्या काळात एका दिवसाला १० हजार रुग्ण वाढले तरी त्यांची व्यवस्था केली जाईल, असा दावा चहल यांनी केला आहे.

१० फेब्रुवारी ते २४ मार्च दरम्यान ५६ हजार २२० चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पण बुधवारी एका दिवसात ४० हजार ४०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ५ हजार ४५८ जण पॉझिटिव्ह आढळले. यातही ८३ टक्के कोरोना रुग्ण लक्षण नसलेले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. महापालिकेचे परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे, असे चहल यांनी सांगितले.

- Advertisement -

या आधीही इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत लॉकडाऊन काय, नाईट कर्फ्यूचीही गरज नसल्याचे विधान केले होते. तेव्हाही चहल यांनी मुंबई कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यात बुधवारी एकाच दिवसात मुंबईत पाच हजारांहून अधिक रुग्ण वाढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -