घरCORONA UPDATEमुंबईत एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर पुर्ण इमारतीऐवजी फक्त मजला सील होणार

मुंबईत एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर पुर्ण इमारतीऐवजी फक्त मजला सील होणार

Subscribe

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. आता कंटेनमेंट झोन आणि सीलबंद इमारती अशी वेगवेगळी वर्गवारी करण्यात येणार आहे. जेणेकरुन एखाद्या इमारतीत एक कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास पुर्ण इमारतीला सील न करता केवळ रुग्ण राहत असलेल्या मजल्याला किंवा एखाद्या भागाला सील करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे नवे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या नियमाचा लाभ बहुमजली इमारतींना होऊ शकतो.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात याआधी २ हजार ८०१ कंटेनमेंट झोन होते. मात्र नवीन नियमावली लागू केल्यानंतर कंटेनमेंटची संख्या कमी होऊन ती ६६१ झाली आहे, तर सील केलेल्या इमारतींची संख्या ११० झाली आहे. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर कोणता भाग सील करायचा किंवा कंटेनमेंट झोनमध्ये टाकायचा याचे अधिकार सुरुवातील वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे संपुर्ण मुबंईत वेगवेगळ्या पद्धतीने अंमलबजावणी होत होती. नवीन आयुक्त आल्यानंतर त्यांनी स्पष्ट निर्देश दिल्यामुळे आता संपुर्ण मुंबईत इमारत सील करण्याबाबत एकसूत्रता आली आहे.

- Advertisement -

याआधी एखाद्या इमारतीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपुर्ण इमारत सील केली जात होती. तसेच त्याठिकाणी पोलीस प्रशासनातील आणि महानगरपालिकेचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जात होते. मात्र महापालिकेच्या निर्णयामुळे आता इमारतीमधील मजला किंवा एखादाच भाग सील करण्यात येईल. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर येणार ताण कमी होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला त्या मजल्यावर जंतुनाशक फवारणी करण्यात येईल.

सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारतीला महापालिकेची नोटीस

दक्षिण मुंबईतील सनदी अधिकाऱ्यांच्या यशोधन सोसायटीमध्ये आणखी एक प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेथील वॉर्ड अधिकाऱ्यांनी यशोधन इमारतीला नोटीस दिली आहे. या नोटीशीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या ठिकाणचा भाग सील करण्यात आल्याचे सांगितले आहे. १६ मे रोजी यशोधन इमारतीमधील रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दि. २९ मे पर्यंत आता इमारतीमधील सर्व रहिवाशांना क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

- Advertisement -

मंत्रालयातील कोविड टास्क फोर्समधील सनदी अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणखी एका प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आधीच कमी मनुष्यबळात काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेवर कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा ताण आला आहे.

a ward officer notice

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -