Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत सोसायट्यांमध्ये मोलकरीन, डिलीव्हरी बॉयला थेट प्रवेश बंद

मुंबईत सोसायट्यांमध्ये मोलकरीन, डिलीव्हरी बॉयला थेट प्रवेश बंद

सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्याआधी डिलीव्हरी बॉय आणि घर काम करणाऱ्या महिलांना मास्क वापरणे बंधनकारक

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा वेग सर्वाधिक आहे. यात मुंबईतील चाळी, झोपडपट्टीपेक्षा इमारतींमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहे. पालिकेने आत्तापर्यंत मुंबईतील शेकडो इमारती सील केल्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने रहिवासी इमारतींसाठी म्हणजेच सोसायट्यांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला(मोलकरीण), डिलीव्हरी बॉयला सोसायट्यांमध्ये थेट प्रवेश करण्यावर बंदी असणार आहे.

सोसायट्यांमध्ये प्रवेश करण्याआधी डिलीव्हरी बॉय आणि घर काम करणाऱ्या महिलांना मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर शारीरिक तापमान तपासणी, ऑक्सिजन तपासणी, हात स्‍वच्‍छ धुणे गरजेचे असणार आहे. तसेच सोसायटीमध्ये प्रवेश केल्यानंतर इतरांशी बोलताना ६ फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे सोसायटीत येणारे वाहनचालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी देखील शारीरिक तापमान तपासणी, ऑक्सिजन तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्याचे बंधने पालिकेने घातली आहे.

- Advertisement -

तसेच ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, सोसायटीमध्‍ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. तेथून निर्जंतुकीकरण करून ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे. असे देखील पालिकेने स्पष्ट केले. याचबरोबर सोसायटीमध्ये वावरताना प्रत्‍येकाने मास्‍क घालणे बंधनकारक आहे.या नियमाचे पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी करावी लागणार असून घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क व हातमोज्‍यांचा वापर करुन बाहेर पडावे. लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे देखील लक्ष द्यावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

त्याचप्रमाणे सोसायटी – वसाहतीमध्ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा तसेच प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे. सोसायटीत दरवाज्याची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे. असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा. लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कच-याच्‍या डब्‍यात टाकावेत. सोसायटीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात धुवावेत. असेही पालिकेने नमुद केले. सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे. स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे. असे आवाहनही पालिकेने केले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -