मुंबईत 30, 31 जानेवारीदरम्यान 12 विभागांत पाणीपुरवठा बंद

no water supply in many parts of mumbai on january 30 31 check list of affected areas here

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा कारण मुंबईत 30 आणि 31 जानेवारीदरम्यान तब्बल 12 विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दोन विभागात 25 टक्के पाणी कपात असणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना हे दोन दिवस पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी यादरम्यान पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने केलं आहे.

मुंबईत 30 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजेपासून ते ३१ जानेवारीपर्यंत सकाळी 10.00 वाजेपर्यंत मुंबईतील 12 विभागात पाणी पुरवठा बंद असेल तर दोन विभागात 24 टक्के पाणी कपात असणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प खात्याद्वारे पाणीपुरवठा विषयक सुधारणांची तसेच परिरक्षणाची विविध कामे महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी हाती घेतली जातात याच कामांचा भाग म्हणून भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4 हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत.

या कामांच्या अनुषंगाने 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे. तर 2 विभागातील पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे जल-अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली आहे.

‘या’ विभागातील पाणीपुरवठा राहणार बंद

यानुसार पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या 9 विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.

तर पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.

वरील व्यतिरिक्त ‘जी उत्तर’ आणि ‘जी दक्षिण’ या 2 विभागातील माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात 30 व 31 जानेवारी 2023 रोजी 25 टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात 30 जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना करण्यात येणारा पाणीपुरवठा हा अधिक सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी ही कामे हाती घेतली जात आहेत. या कामांमुळे 29 जानेवारी तसेच 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या उपरोक्त विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.


लखनऊमध्ये 4 मजली इमारत कोसळली; अनके जण अडकल्याची भीती, मदतकार्य सुरू