घरमुंबईBMC : धोकादायक दरडी, इमारतींच्या भागात आपत्कालीन 'रेकी'; तयारी पावसाची

BMC : धोकादायक दरडी, इमारतींच्या भागात आपत्कालीन ‘रेकी’; तयारी पावसाची

Subscribe

 

 

- Advertisement -

मुंबई: मुंबईतील १५ ठिकाणच्या डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच,२२६ ठिकाणी अतिधोकादायक इमारती आहेत. पावसाळ्यात सदर ठिकाणी दुर्घटना घडून मोठी जिवीत आणि वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता असते.
ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभाग व स्थानिक प्राधिकरणाची यंत्रणा मिळून संयुक्तपणे सदर धोकादायक ठिकाणी ‘रेकी’ करणार आहेत. जर एखादी दुर्घटना घडल्यास घटनास्थळी तात्काळ आपत्कालीन यंत्रणेची मदत वेळेत पोहचविण्यात येणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची व धोकादायक इमारतींच्या दुर्घटना घडण्याची शक्यता पाहता पालिका व स्थानिक प्राधिकरण यंत्रणेला आवश्यक उपाययोजना करण्याचे व सज्ज राहण्याचे आदेश आढावा बैठकीत दिले आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत विविध यंत्रणांची पावसाळापूर्व तयारीची बैठक गुरुवारी १ जून रोजी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनामार्फत देण्यात आले. त्यासोबच नागरिकांच्या मदतीसाठीचे नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.
या बैठकीला महापालिकेच्या विविध विभागांसह बेस्ट, एमएमआरडीए, भारतीय हवामान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, तटरक्षक दल, भारतीय नौदल, विमानतळ प्राधिकरण, अदाणी इलेक्ट्रिसिटी आदी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी सर्व यंत्रणांनी योग्य माहिती उपलब्ध करून द्यावी. ज्यामुळे मदतकार्य पोहोचवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला सोयीचे होईल, अशा सूचना सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींना यावेळी दिल्या. त्यासोबतच विविध यंत्रणांनी आपल्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन कार्यरत आहेत का ? याची खातरजमा करण्याचे आवाहन आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे संचालक महेश नार्वेकर यांनी केले.

अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिसांचा सहभाग

मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या समन्वयातून चाचपणीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), मुंबई अग्निशमन दल, भारतीय नौदल, मुंबई वाहतूक पोलीस यादेखील यंत्रणा या रेकीमध्ये सहभाग घेणार आहेत. चिंचोळ्या भागात मदतकार्य पोहोचवण्यासाठीची आव्हाने प्रामुख्याने काय आहेत, या बाबींची पडताळणी यानिमित्ताने करण्यात येईल. त्यामध्ये, मदत पोहोचवण्यासाठीचे मार्ग, मदतकार्यासाठी वाहनांचे मार्ग, रूग्णवाहिका आणि अग्निशमन दल यासारख्या यंत्रणेची सज्जता अशा बाबींची चाचपणी होईल.
मुंबई महापालिका क्षेत्रात १५ दरडप्रवण क्षेत्रांचा समावेश आहे. याठिकाणी आगामी पावसाळ्याच्या कालावधीत धोका असू शकतो. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला अतिरिक्त दोन तुकड्या तैनात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. घाटकोपर आणि कुर्ला या ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात या अतिरिक्त तुकड्या सज्ज असणार आहेत. या दरडप्रवण क्षेत्रात मदतकार्य पोहचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबईतील जीर्ण आणि धोकादायक स्थितीतील इमारतींच्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य पोहोचवण्यासाठी देखील रेकी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -