घरCORONA UPDATEकेईएम रुग्णालयातील कोरोना कक्ष महात्मा गांधी रुग्णालयात हलविणार?

केईएम रुग्णालयातील कोरोना कक्ष महात्मा गांधी रुग्णालयात हलविणार?

Subscribe

परळ येथील केईएम रुग्णालयात कोरोना कोविड १९च्या बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. परंतु याठिकाणी कोरोनाबाधित डायलिसीस रुग्णांवर डायलिसिस करण्यात येते. त्यामुळे येथील केवळ १४ ते १५ बाधित रुग्णांमुळे सर्वसामान्य आजारांचे निदान करणाऱ्या केईएम रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांची गैरसोय होत आहे. या करता येथील कोरोना बाधित रुग्णांचा कक्ष आता जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्याचा विचार सुरु आहे. याठिकाणी सर्वप्रकारची दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करून केईएम रुग्णालय आता कोरोना रुग्णापासून बाजुला करण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्यांचे रुग्णालय असलेल्या केईएम मध्ये पुन्हा एकदा उपचार यंत्रणा राबवली जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांवर कस्तुरबासह केईएम रुग्णालयांमध्ये प्रथम आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून केईएम रुग्णालयातील ओपीडी बंद असून मोठ्या आजारांच्या रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. मात्र, एका बाजुला खासगी दवाखाने बंद असून खासगी रुग्णालयांमध्ये जाणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नसल्यामुळे केईएम अभावी काही प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत होती. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत तसेच नगरसेवक सचिन पडवळ आदींनी केईएम रुग्णालयातील कोरोनावरील उपचार बंद करून ते सर्वसामान्य उपचारासाठी खुले ठेवावे, अशी मागणी केली. त्याअनुषंगाने महापौरांनी प्रशासनाचे अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी तसेच कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक आणि टास्कफोर्सच्या अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा करून परळमधील राज्य शासनाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणी केली. त्यानुसार महापालिकेने या रुग्णालयाची पाहणी केली असून याठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता केईएम रुग्णालयातही कोरोनाचे रुग्णांना सध्या दाखल करून घेण्यात येत नसल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

केईएम रुग्णालयात १७०० खाटांची क्षमता आहे. तर दरदिवशी ७ ते ८ हजार रुग्ण ओपीडीमध्ये उपचार घेत असतात. तर सुमारे १५०० ते १७०० रुग्ण दाखल करून घेतले जातात. त्यामुळे केवळ १४ ते १५ कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण रुग्णालय वेठीस धरणे योग्य नसून आजच्या घडीला सर्वसामान्यांना हे रुग्णालय आवश्यक बाब ठरली आहे. त्यामुळे प्रशासन याबाबीचा विचार करत असला तरी काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महात्मा गांधी रुग्णालय ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती . अखेर केईएम रुग्णालयाला कोरोनापासून बाजुला ठेवताना या पर्यायाचा विचार होताना दिसत असून याठिकाणी १५० खाटांचा कक्ष स्थापन करण्याचा विचार प्रशासनाचा असल्याचेही बोलले जात आहे. त्यादृष्टीकोनातून महापालिकेची यंत्रणाही कामाला लागली आहे.

यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केईएम रुग्णालयात कोरोनाबाधित किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर डायलिसिस करण्यात येते. त्यासाठी २६ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी डायलिसिसचे रुग्ण नसल्याने मग कोरोना बाधित रुग्ण असल्यास त्याला तिथे दाखल केले जाते. परंतु ते फक्त कोरोना कोविड १९साठीच फक्त नाही. आणि महात्मा गांधी रुग्णालयाबाबत यापूर्वी चर्चा झाली होती. तेव्हा आम्ही त्या रुग्णालयाची पाहणी केली होती. पण त्यात बरेच दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. परंतु दोन दिवसांपूर्वी ही कामे पूर्ण झाल्याचे मला सांगण्यात आले आहे. त्यानुसार मी माझी टिम तिथे पाहून पाहणी करणार आहे. त्यानंतर केईएममधील कक्ष तिथे हलवता येईल कि अन्य काही करता येईल याचा विचार केला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -