घरCORONA UPDATEसंभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व यंत्रणा सतर्क

संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व यंत्रणा सतर्क

Subscribe

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर दिनांक ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून सर्व उपाययोजना समन्वयाने करण्यात येत आहेत. मुंबईकर नागरिकांनी देखील आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ३ जून २०२० रोजी पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीमध्ये वेगवान वारे वाहण्याची शक्यता असून समवेत जोरदार पाऊस देखील कोसळू शकतो. ही स्थिती लक्षात घेता महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. तटरक्षक दल, नौदल, मुंबई अग्निशमन दल यांच्यासह राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके सुसज्ज करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हाती घेण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱयांना आपल्या विभागातील संभाव्य धोका पोहोचू शकणाऱया वसाहती तसेच सखल भागातील वसाहती निश्चित करून तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मच्छीमार व इतरांनी देखील समुद्रात जाऊ नये, समुद्रकिनार्‍यापासून लांब रहावे, झाड आणि खांब यांच्याखाली नागरिकांनी उभे राहू नये, वादळाच्या कालावधीमध्ये घराबाहेर पडू नये, अशी विनंती करण्यात येत आहे.

मुंबईतील मोठ्या औद्योगिक आस्थापना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांनी आपली यंत्रणा व सामुग्री सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. मुंबईतील सर्व रुग्णालयांनी वीज जनित्र (जनरेटर) कार्यान्वित आहेत, याची दक्षता घेऊन वीजपुरवठा अखंड सुरू राहील, याची तजवीज करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, आवश्यक साधने जवळ बाळगावीत आणि वैयक्तिक स्तरावर देखील खबरदारी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -