Rani Baug: राणी बागेचे नाव बदलले ही अफवा, पालिकेचा खुलासा

राजकीय पोळी भाजण्याचं काम 

BMC said Rani Bagh has been renamed is Rumor
BMC said Rani Bagh has been renamed is Rumor

भायखळा येथील पालिकेच्या उद्यानाचे नाव ‘राणी बाग’ नसून ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक या उद्यानाला ‘राणीबाग’ या नावाने संबोधत आले आहेत. या उद्यान परिसरातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे, त्यामुळे उद्यानाचे नाव बदललेले नाही, असा खुलासा प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी केला आहे.

‘राणी बाग’ म्हणन प्रचलित झाले आहे. आता या उद्यान व प्राणी संग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ‘पेंग्विन’ सह नवीन पशु– पक्षी या प्राणी संग्रहालयात आणण्यात आले आहेत. पेंग्विनला बघण्यासाठी बच्चे कंपनी विशेष गर्दी करते.
मात्र या उद्यान व प्राणी संग्रहालयाचे नाव बदलण्यात आले आहे. राणीबागेचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे करण्यात आले आहे, असा मेसेज व फोटो सध्या ‘सोशल मिडिया’ वर फिरत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. याबाबत, पालिका उद्यान व प्राणी संग्रहालयातर्फे वरीलप्रमाणे खुलासा करण्यात आला असून कोणत्याही प्रकारे नाव बदलण्यात आलेले नसल्याचा दावा
पालिकेने केला आहे.

इंग्लंडच्या राणीसाठी मुंबईच्या भायखळा येथे खास उद्यान बनवण्यात आले. त्यात प्राणी पक्षी आणि विविध प्रकारची झाडे आहेत. सदर उद्यान १८६१ साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्वकाळात तयार झाले. इंग्लंडच्या राणीसाठी हे उद्यान बनवले असल्याने या उद्यानाचे नाव ‘व्हिक्टोरिया गार्डन’ असे होते. त्याला मराठीमध्ये ‘राणीचा बाग’ असे म्हणत.
मात्र त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात या उद्यानाचे नाव ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय’ असे करण्यात आले. मात्र याच उद्यान व प्राणी संग्रहालयात मागील अनेक वर्षांपासून ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा आहे. ‘हजरत हाजी पीर बाबा’ राणी बागवाले म्हणून त्याची ओळख असून नूतनीकरण कामाच्या अंतर्गत
दर्ग्याचा नामफलक नव्याने लावण्यात आला आहे. मात्र त्यात ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे नाव दर्शवल्याने कोणीतरी या उद्यान व प्राणी संग्रहालयाचे म्हणजेच राणी बागेचे नाव बदलले, अशी अफवा सोशल मिडियावर पसरवली. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. अखेर पालिकेला त्याबाबत खुलासा करावा लागला.

राजकीय पोळी भाजण्याचं काम 

उद्यानाचे नाव बदलले असल्याचे सांगणारे व्हायरल दावे खोटे आहेत. राणीबागेत ‘हजरत हाजी पीर बाबा’ यांचा दर्गा अनेक वर्षांपासून आहे. या दर्ग्यात हिंदू मुस्लिम सर्वच लोक माथा टेकतात. त्यामुळे या सौहार्दाच्या ठिकाणास उगाच धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचं काम विरोधक करत आहेत. उद्यानाचे नाव वीरमाता जिजाऊंच्या नावेच आहे आणि भविष्यात राहील. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.