घरताज्या घडामोडी'करोना'च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना खर्च करण्याचे विशेष अधिकार

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना खर्च करण्याचे विशेष अधिकार

Subscribe

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली असून ‘करोना’ची लागण झालेले आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या रूग्णांना विविध प्रकारची सेवा आणि साहित्य सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त यांना ५ ते १० कोटी रुपये आणि दोन उपयुक्त यांना १ ते ५ कोटी रुपये तर केईमचे अधिष्ठाता यांना ५० लाख रुपये आणि सहायक आयुक्त यांना २५ लाख रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. ‘करोना विषाणू’चा आजाराने जगात हाहाकार उडवून दिल्याने या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महपलिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांनी हे आदेश जारी केले आहेत. याबाबत स्थायी समितीची विशेष बैठक बोलावून याला मान्यता देण्यात येत आहे.

मुंबई महापलिकेच्या वतीने कस्तुरबा रुग्णालयात करोनाच्या रुग्णांवर तसेच याची लक्षणे सदृश्य आढळून आलेल्या रुग्णांवर उपचार केला जातो. कस्तुरबासह राजावाडी, वांद्रे व कुर्ला भाभा आणि जोगेश्वरी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात विशेष आयसोलेशन वॉर्ड अर्थात विलगीकरण कक्ष तयार करून उपचार यंत्रणा राबवली जात आहे. तर सेव्हन हिल्स मध्ये४०० खाटांचे अलगीकरण तयार करण्यात आले आहे. मुंबईत या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच अशा रुग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खर्च होणार आहे. याकरता आयुक्तांनी हा खर्च करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना प्रदान केला आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांना यासाठी आवश्यक असा ५ ते १० कोटी एवढा निधी खर्च करण्याचे अधिकार दिले आहे.

- Advertisement -

तर उपायुक्त रमेश पवार आणि पराग मसुरकर यांना १ ते ५ कोटी रुपये खर्च करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले, शिवाय २४ विभागाच्या सहायक आयुक्त यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचे तर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांना ५० लाख रुपयांपर्यन्त खर्च करण्याचे अधिकार देत सर्व उपचार यंत्रणा सुरळीत राखण्याचा सूचना केल्या आहेत. हा खर्च विशेष बाब म्हणून खर्च करण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -